आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी लेबर कॉलनी बोलतेय..!:आजची रात्र आठवणी, आसवे अन‌् अलविदा म्हणण्याची !

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या लेबर कॉलनीतील 338 घरे बुधवारी जमीनदाेस्त हाेणार आहेत. गेल्या ६५ वर्षांहून अधिक काळ अनेक कर्मचाऱ्यांच्या चिल्यापिल्यांना हक्काचा निवारा देणारी, अनेक कुटुंबांच्या सुख-दु:खाची साक्षीदार असलेली ही कॉलनी आता वयाेमानाने जर्जर झालीय. मात्र अजूनही तिच्यात जगण्याची उमेद कायम आहे. आपला अंत समाेर दिसत असताना लेबर कॉलनी औरंगाबादकरांशी अखेरचा संवाद साधतेय, ताे तिच्याच शब्दांत...

१९५३ च्या दशकात औरंगाबाद शहराचा आवाका फार छोटा होता. विविध गाव व शहरांतून आलेल्या नोकरदार, अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी लेबर कॉलनी, विश्वासनगर वसाहतीची म्हणजे माझी निर्मिती शासनाने केली. गेल्या उण्यापुऱ्या ७० वर्षांत मी अनेक कुटुंबांचा संसार फुलताना पाहिला. भारतीय संस्कृती पाहावी तर ती फक्त माझ्याच कुशीत. दिवाळी, दसरा, ईद, डाॅ. आंबेडकर जयंती अन् ख्रिसमस सगळे एका कुटुंबासारखे साजरे करत, असा आनंदात बुडालेला काळ मी अनुभवला. परंतु अचानक शासन, न्यायालयाच्या निर्णयाने सारे काही संपले. आता माझ्या उरात स्मशानशांतता आहे. पाणावलेले डोळे, चिंताक्रांत चेहरे, घरातील सामानाची आवराआवर करतानाचे हात, वेदना स्पष्टपणे दिसत आहेत. एकेकाळी सुखी, समृद्ध आणि आनंदाने तोऱ्यात राहणारी मी स्वत: वेदनेने व्याकूळ झाली आहे. मला आठवते ती एक चिमुकली मुलगी. अवघ्या १३ व्या वर्षी लग्न करून आली होती. आईविना ती पोर त्या वेळी मोठी अवखळ होती. तिच्या समवयस्क मुलींसोबत चिरखणी, लंगडी, सागरगोटे खेळायची. आज कॅन्सरच्या विळख्यात सापडलेली ती वयाच्या नव्वदीत पोहोचली आहे. तिला जवळचे नातेवाईक नाहीत. “या वयात घर कुठं शोधणार?’ या विचाराने तिला फुटलेले हुंदके ऐकून मी स्तब्ध झाले. तिची कशी समजूत घालावी, हेच मला कळत नाहीये. हैदराबादमधून आलेल्या एका मुलीचीही अशीच कहाणी. ती आता ९२ वर्षांची झालीय. इथेच शेवटचा श्वास घेण्याची तिची इच्छा अपुरी राहणार आहे. असं म्हणतात की, एकवेळ नातेवाईक मदतीला धावून येणार नाहीत, पण शेजारी नक्की येतात. पण इथे सारेच शेजारी संकटात पडले आहेत.

कोण कुणाकडे मदत मागणार आणि कोण मदत करणार? तुम्हाला सांगते, एक काळ असा होता की लेबर काॅलनीतील लोक एकमेकांच्या मदतीला तर धावून जात होतेच; पण कधी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला तर मोर्चेकरी आणि पोलिसही याच काॅलनीतील झाडांच्या आसऱ्याला यायचे. त्यांना चहापाणी इथलेच लोक देत. त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत. कधी एखादा खूपच दीनवाणा, भुकेला आंदोलक असेल तर त्याला इथल्या महिला चटणी, भाकरीही देत असत. पण अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेल्या माझ्या आरोग्याची कधी शासनाने नीटपणे काळजी घेतली नाही. कधी डागडुजी केली नाही. त्यामुळे एक-एक चिरा ढासळत गेला. भेगा वाढत गेल्या. आणि आता तर माझ्यावर बुधवारी बुलडोझर चालणार आहे. मी सर्वांचा अखेरचा निरोप घेणार आहे. औरंगाबादच्या इतिहासातील एक ऐतिहासिक वास्तू काळाच्या पडद्याआड जाणार आहे. तिची पुढील पिढ्यांना आठवण राहावी, एवढीच विनंती. बाकी काही नाही...
शब्दांकन : फेरोज सय्यद

बातम्या आणखी आहेत...