आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादचा लाॅकडाऊन रद्द:जनतेच्या तीव्र विराेधामुळे टळला लाॅकडाऊन, 25 पेक्षा जास्त संघटना मैदानात उतरल्यामुळे प्रशासन झुकले

औरंगाबादचा लाॅकडाऊन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे चुकीचेच | लाॅकडाऊनचा निर्णय रद्द हाेताच खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमाेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून, केक कापून जल्लाेष केला. विशेष म्हणजे इतरांना मास्क वापरण्याचे आवाहन करणाऱ्या खासदारांनी व त्यांच्या एकाही समर्थकाने मास्क घातलेला नव्हता. संचारबंदीच्या नियमाचेही उल्लंघन केले. त्यांच्यावर कारवाईचे धाडस प्रशासन दाखवेल का? - Divya Marathi
हे चुकीचेच | लाॅकडाऊनचा निर्णय रद्द हाेताच खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमाेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून, केक कापून जल्लाेष केला. विशेष म्हणजे इतरांना मास्क वापरण्याचे आवाहन करणाऱ्या खासदारांनी व त्यांच्या एकाही समर्थकाने मास्क घातलेला नव्हता. संचारबंदीच्या नियमाचेही उल्लंघन केले. त्यांच्यावर कारवाईचे धाडस प्रशासन दाखवेल का?
  • खासदार इम्तियाज यांचा आजचा माेर्चा रद्द

सामान्य नागरिकांमधून व्यक्त हाेणारा तीव्र राेष, आमदार-खासदार, व्यापाऱ्यांसह विविध संघटनांकडून हाेणाऱ्या विराेधापुढे झुकत अखेर जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून (३१ मार्च) आैरंगाबादेत लागू हाेणारा कडक लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेतला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून बुधवारी काढण्यात येणारा माेर्चाही रद्द करण्यात आल्याची घाेषणा पत्रकारांशी बाेलताना केली.

आैरंगाबाद जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संसर्गाची ही साखळी ताेडण्यासाठी ११ मार्चपासून अंशत: लाॅकडाऊन लावण्यात आला हाेता. त्यानुसार दरराेज रात्री आठनंतर संचारबंदी व शनिवार-रविवार पूर्ण बाजारपेठ बंदचे आदेश हाेते. मात्र त्यानंतरही रुग्णसंख्येचा वाढता आलेख कमी हाेत नव्हता. त्यामुळे ३० मार्चपासून कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र नंतर त्यात थाेडासा बदल करून ३१ मार्चपासून हे आदेश लागू करणार असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी दुपारी सर्वपक्षीय लाेकप्रतिनिधींची बैठक घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लाॅकडाऊन लावणे कसे गरजेचे आहे ते सांगितले. मात्र या बैठकीतही लाेकप्रतिनिधींनी लाॅकडाऊनला तीव्र विराेधच दर्शवला. तत्पूर्वी छाेटे- माेठे व्यापारी, उद्याेजक व विविध संघटनांनीही विराेधात भूमिका घेतली हाेती. सामान्यांमधूनही प्रशासनाविराेधात प्रचंड राेष वाढत हाेता. खासदार इम्तियाज जलील यांनी तर ३१ मार्च राेजी लाॅकडाऊनविराेधात माेर्चा काढण्याचा इशाराही दिला हाेता. छाेट्या-माेठ्या व्यापाऱ्यांसह २५ हून अधिक संघटनांनी या माेर्चाला पाठिंबा जाहीर करून रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली हाेती. या जनक्षाेभापुढे झुकत प्रशासनाने अखेर लाॅकडाऊनचा निर्णयच रद्द केला.

काेराेना संपलेला नाही, विनामास्क फिरू नका
खासदार इम्तियाज म्हणालेे, ‘हा जनतेचा विजय आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचे आश्वासन पालकमंत्री, आयुक्तांनी दिले आहे. आता माेर्चा काढण्याची गरज राहिलेली नाही. लाॅकडाऊन नसला तरी काेराेना संपलेला नाही, त्यामुळे काेणीही मास्कशिवाय बाहेर पडू नये.’

आमदारांनीही मांडली भूमिका
आमदार अतुल सावे
: यापूर्वीचे जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींशी संवाद साधून निर्णय घेत होते. आता तसे हाेत नाही. लॉकडाऊनला आमचा विरोध आहे. कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गरजूंना जेवण द्यावे.

आमदार सतीश चव्हाण : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणे स्थानिक व्यापाऱ्यांना आपला माल घरपोच वितरण करण्यास परवानगी द्यावी. डॉक्टरांची संख्या आणखी वाढवावी.

आमदार संजय शिरसाट : खासगी दवाखान्यातून रुग्णांची लूट हाेणार नाही, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
आमदार हरिभाऊ बागडे : बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सूट द्यावी.

जिल्हाधिकारी सकाळी म्हणाले नाइलाजाने घेतला निर्णय
सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी लाेकप्रतिनिधींच्या बैठकीत लाॅकडाऊनचे समर्थन केले हाेते. ते म्हणाले, ‘शहरात हॉटस्पॉट वाढत असल्याने नाइलाजाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणेला आपली क्षमता वाढवण्यास मदत हाेईल. गरजूंना शिवभोजनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.’

रात्री १०.३० वाजता म्हणाले सरकारच्या सूचनेमुळे निर्णय रद्द
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पाेलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन लाॅकडाऊन रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, ‘काही संघटनांनी, व्यापाऱ्यांनी व लाेकप्रतिनिधींनी आम्हाला लाॅकडाऊनविराेधात भावना कळवल्या हाेत्या. त्या राज्य सरकारला आम्ही कळवल्या हाेत्या. त्यावर विचार करून प्रधान सचिव आणि पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनांनुसार लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला.’ दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना उपचार कसे देता येतील यासाठी आमचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत.’

प्रशासनाला उशिराचे शहाणपण; पण आपली जबाबदारी वाढली!
हजाराे लाेकांच्या राेजगारावर गदा आणणारे लाॅकडाऊनचे संकट तूर्त तरी टळले. जनरेट्यासमाेर झुकून उशिरा का हाेईना प्रशासनाला हे शहाणपण सुचले, त्याचे स्वागतच करायला हवे. अर्थात या निर्णयाने १५ लाख औरंगाबादकरांवरील जबाबदारी वाढली आहे. काेराेना रुग्णांची वाढती संख्या व वाढते बळी हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. मात्र व्यवसाय, बाजारपेठ बंद केल्याने रुग्णसंख्या घटत नाही याचा अनुभव यापूर्वीही महाराष्ट्राने घेतलेला आहे. उलट अशा निर्णयामुळे आजारपणाएेवजी उपासमारीनेच मरण्याची वेळ काही जणांवर येऊन ठेपली हाेती. त्यामुळे हा निर्णय गेले वर्षभर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सामान्य नागरिकांच्या राेजीराेटीवर वरवंटा फिरवणाराच ठरला असता. ‘दिव्य मराठी’नेही भूमिका मांडून त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते.

संसर्गाची साखळी ताेडण्यासाठी नाइलाजानेच कठाेर निर्णय घेत असल्याची प्रशासनाची भूमिका हाेती. त्यांच्या प्रामाणिक उद्देशाबद्दल काेणाच्याही मनात तिळमात्र शंका नाही. एक-एक जीव वाचवण्यासाठी डाॅक्टर्स, आराेग्य कर्मचारी व प्रमुख अधिकारी-कर्मचारी २४ तास अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सहकार्य करणे, किमान त्यात खाेडा न घालणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हणूनच आज जनरेट्यापुढे झुकलेल्या प्रशासनाला यापुढेही आपण दबावाचे राजकारण करून वाकवू शकताे आणि आपण कसेही, मनमानी पद्धतीने वागू शकताे या भ्रमात आैरंगाबादकर जनतेने व नेत्यांनी, राजकारण्यांनी राहू नये. काेराेना नियंत्रणासाठी प्रशासनाने जे निर्बंध घातले आहेत त्याचा आदर करणे, नियमांचे पालन करणे हे या शहराचा जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्यच आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा काटेकाेर वापर करण्याची आपली जबाबदारी आहे. लाेकप्रतिनिधींनीही प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून त्यासाठी जनजागृती करायला हवी. केवळ माझे कुटुंबच नव्हे तर हे शहर माझ्यामुळे बाधित हाेणार नाही याचे भानही आपल्याला राखावे लागेल. नियम पाळले तरच आपण काेराेना संकटावर मात करू शकताे. अन्यथा आजच्या निर्णयानंतर ‘विजयाचा उन्माद’ साजरा करत बेफिकिरीने वागाल तर आज टळलेले लाॅकडाऊनचे भूत पुन्हा मानगुटीवर बसण्यास वेळ लागणार नाही. - संपादक

लाेकप्रतिनिधींनी जनजागृतीसाठी मदत करावी : जिल्हाधिकारी
‘खासदार व व संघटनांच्या दबावापोटी हा निर्णय घेतला का?’ या प्रश्नावर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘लोकशाहीत सगळ्यांना विचार मांडण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे त्यांनी लॉकडाऊनला विरोध केला त्याचप्रमाणे त्यांनी आता जनजागृती, लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.’

बातम्या आणखी आहेत...