आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चुकीला माफी नाही!:कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन भोवले मास्क न घालता जमवली गर्दी, रात्रीची संचारबंदी धुडकावून काढली मिरवणूक; ‘दिव्य मराठी’च्या बातमीनंतर कारवाई

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेजबाबदार खासदार इम्तियाज यांच्यासह अनेक समर्थकांवर गुन्हे; सर्वपक्षीय आमदार-खासदारांनीही घेतला समाचार

लाॅकडाऊन तूर्त स्थगित केल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मंगळवारी रात्री अापल्या निवासस्थानी समर्थकांची गर्दी जमवून मिरवणूक काढणारे व विनामास्क त्यात सहभागी हाेणारे खासदार इम्तियाज जलील व त्यांच्या अनेक समर्थकांवर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात अाला. खासदारांनी काेराेना नियंत्रणासाठी लावलेल्या रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली. दरम्यान, हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्यावर राज्यभरातून टीकेची झाेड उठली हाेती. औरंगाबादेत ३१ मार्चपासून कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला हाेता. मात्र त्याला सर्वच स्तरातून तीव्र विराेध हाेत हाेता. नागरिकांना हाेणाऱ्या अडचणीची दखल घेऊन खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाविराेधात ३१ मार्च राेजी भव्य माेर्चा काढण्याचा इशाराही दिला हाेता. त्याला सुमारे २५ संघटनांनी समर्थन दिले हाेते. दरम्यान, वाढत्या जनरेट्यापुढे झुकत अखेर प्रशासनाने तूर्त लाॅकडाऊनचा निर्णय स्थगित केल्याचे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जाहीर केले.

खासदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी या निर्णयाचे जल्लाेेषात स्वागत केले. रात्रीच्या संचारबंदीचे नियम धुडकावून चक्क मिरवणूकही काढली. त्या मिरवणुकीत इम्तियाज हे स्वत:ही सहभागी झाले हाेते. ना त्यांच्या ताेंडाला मास्क हाेता ना त्यांच्या समर्थकांच्या. लाेकांना मास्क वापरण्याचे अावाहन करणाऱ्या लाेकप्रतिनिधींकडून झालेला हा बेजबाबदारपणा दैनिक दिव्य मराठीने बुधवारच्या अंकात सर्वांसमाेर अाणला. विनामास्क मिरवणुकीत फिरणाऱ्या खासदारांचे व त्यांच्या समर्थकांचे फाेटाेही प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन सिटी चाैक पाेलिसांनी इम्तियाज यांच्यासह काही माजी नगरसेवक व समर्थकांवर गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईसाठी पाेलिसांना निवेदनही दिले हाेते.

लॉकडाऊन रद्दचा निर्णय झाल्यानंतर समर्थकांची विनामास्क गर्दी जमवून मिरवणूक काढणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी टीका केली आहे. ‘जे स्वतः मास्क वापरत नाहीत, ते आपल्या समर्थकांना कोणत्या तोंडाने मास्क लावायला सांगतील?’, असा सवालही सर्वच नेत्यांनी विचारला.

सामाजिक कृतीपेक्षा स्टंट अधिक
खासदार डॉ. भागवत कराड : ‘ खासदार इम्तियाज जलील हे सामाजिक कृतीपेक्षा राजकीय स्टंट अधिक करतात. आम्हीही लॉकडाऊन न करण्याबाबत निवेदन दिले होते. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही लॉकडाऊन करू नका, अशी मागणी केली होती. मात्र, आम्ही कुठेही गर्दी करून मोर्चा, आंदोलनाची भाषा केली नाही. कारण आम्हाला कोरोना नियंत्रणात आणायचा आहे. इम्तियाज जलील हे असले राजकीय स्टंट करून हीरो होण्याचा प्रयत्न करतात. पण, राजकारणापेक्षा आपल्या सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, हे मी डॉक्टर या नात्याने सांगतो.’

आनंद कसला साजरा करता?
अामदार संजय शिरसाट : ‘कोरोना वाढीसाठीच जणू इम्तियाज हे प्रयत्नशील आहेत. स्वतः मास्क लावत नाहीत, ते कोणत्या तोंडाने कार्यकर्त्यांना सांगतील? लोकप्रतिनिधींकडून अशी कृती होणे अयाेग्य आहे. ही राजकीय स्टंटबाजी आहे. लॉकडाऊनला स्थगिती मिळाली, ही काही गर्दी जमवून आनंदोत्सव साजरा करण्याची गोष्ट आहे का?’ दरम्यान, अामदार अंबादास दानवे व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही इम्तियाज यांच्यावर टीका केली.

माझी चूक झाली, जी कारवाई हाेईल ती मान्य : इम्तियाज
‘लाॅकडाऊन रद्द झाल्याने अानंदित झालेले सर्वसामान्य लाेक, व्यापारी, कामगार माझ्या निवासस्थानाबाहेर अाले हाेते. मी घराबाहेर येताच त्यांनी मला खांद्यावर घेतले व जल्लाेष केला. त्या वेळी माझ्या व इतरांच्या ताेंडाला मास्क नव्हता. ही चूक मी मान्य करताे. कायदा सर्वांसाठी समान असताे. त्यामुळे अशा चुकीसाठी सर्वसामान्यांवर जी कारवाई हाेते तीच माझ्यावर झाली तरी अापण त्यास सामाेरे जाण्यास तयार अाहाेत,’ अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. मात्र ही गर्दी मी जमा केली नव्हती, तर लाेक स्वयंस्फूर्तीने अाले हाेते, असेही ते म्हणाले. ‘सत्ताधारी व प्रमुख विराेधी पक्ष या विषयाचे राजकारण करत अाहेत. जनहिताची कामे ते करू शकलेले नाहीत. मी सामान्य नागरिकांना न्याय देऊ शकलाे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातून ते राजकारण अाहेत,’ असा अाराेपही त्यांनी टीकाकारांवर केला.

‘माेदी, शहांना नियम शिकवा’
भाजपच्या नेत्यांना उद्देशून इम्तियाज म्हणाले, ‘नरेंद्र माेदी, अमित शहा पश्चिम बंगालमध्ये नियम पायदळी तुडवून सभा घेत अाहेत. माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्यांनी अापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही काेराेनाचे नियम शिकवावेत,’ असा टाेला त्यांनी भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर व इतरांना लगावला.

‘जे स्वतःच मास्क लावत नाहीत, तेइतरांना कोणत्या तोंडाने सांगतील’

गर्दीमुळेच वाढतोय कोरोना
आमदार हरिभाऊ बागडे : ‘खरे तर गर्दीमुळेच कोरोनाचा कहर वाढतोय. निदान लोकप्रतिनिधींनी तर आधी ही बाब आवर्जून लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनीच गर्दी टाळावी. मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचे सर्वांनीच पालन करायला हवे.’

खासदारांवर कारवाई करा
आमदार अतुल सावे : ‘सरकार आणि प्रशासन सामान्य लोकांना दंड लावते, गुन्हे दाखल करते. आता राजकीय नेत्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे, या लोकांवरदेखील कारवाई व्हावी. विनामास्क असलेल्या गर्दीत खासदार, माजी नगरसेवक दिसत आहेत. प्रशासनाने थेट गुन्हे दाखल करावेत.’

कारवाई व्हायलाच हवी
आमदार प्रदीप जैस्वाल : ‘विनामास्क आणि अंतर पाळले नाही तर सामान्य माणसे, दुकानदारांवर प्रशासन कारवाई करते. खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही अशी कारवाई करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे. खासदार, आमदार किंवा सामान्य माणूस असो, असे कृत्य केल्यास कारवाई व्हायलाच हवी.’

बातम्या आणखी आहेत...