आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेल्टा प्लसचा धसका:शहरात पुन्हा वीकेंड लॉकडाऊन शक्य; सोमवारी बैठकीनंतर होणार अंतिम निर्णय - जिल्हाधिकारी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगावहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी

सर्वात घातक ठरलेल्या काेराेनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात वाढत चालले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धाेका गृहीत धरून सरकारने पुन्हा राज्यात नव्याने निर्बंध लागू करण्याचे सूताेवाच केले आहे. त्यानुसार औरंगाबाद शहरात रुग्णसंख्या कमी असली तरीही ७ जूनपासून उठवण्यात आलेले सर्व निर्बंध पुन्हा एकदा लागू हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रामीण भागाप्रमाणे मनपा हद्दीचा भागही लेव्हल तीनमध्ये समाविष्ट केल्यास शहरातही पुन्हा सकाळी ७ ते ४ या मर्यादित वेळेतच बाजारपेठ सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, साेमवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शेजारच्या जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंंटचे रुग्ण सापडल्यामुळे या जिल्ह्यातून औरंगाबादेत येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या जळगावला जोडल्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील एन्ट्री पॉइंटवर (चेक नाके) आरटीपीसीआर चाचण्या केल्या जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. नव्या निर्णयानुसार दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीदेखील लावली जाऊ शकते.

जिल्हा प्रशासनातर्फे चाचण्या वाढवण्याबराेबरच जास्तीत जास्त लसीकरण करण्यावरदेखील भर दिला जाणार आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील जनतेने आजपर्यंत सहकार्य केले असून यापुढेही असेच सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...