आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:आता लॉकडाऊन वाढणार नाहीच; संचारबंदी संपल्यानंतर रविवारपासून रस्त्याच्या दुतर्फा दुकाने सुरू राहणार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संचारबंदीचे पाचच दिवस : कटाक्षाने नियम पाळा

शहरात १० ते १८ जुलैदरम्यान लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सुरुवातीच्या चार दिवसांत सर्वसामान्य नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लाॅकडाऊनची मुदतही वाढवली जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, जिल्हाधिकारी उदय चाैधरी व मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या अफवांचे खंडन केले.

‘१८ जुलैनंतर लाॅकडाऊन वाढवण्यात येणार नाहीच. तसेच पी-१, पी-२ हा फाॅर्म्युलासुद्धा आता मागे घेण्यात येणार असून १९ जुलैपासून रस्त्याच्या दाेन्ही बाजूंची दुकाने राेजच सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत उघडी राहतील,’ असे स्पष्टीकरण या दाेन्ही अधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिले. मात्र ज्या आस्थापनांना राज्य सरकारने अद्याप सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही. त्या बंदच राहतील. सरकारचे जे नवीन आदेश येतील त्याचे कटाक्षाने पालन केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

५ जूनपासून ‘अनलाॅक’ करताना मनपा प्रशासकांनी शहरातील एका बाजूची दुकाने सम तारखेला व दुसऱ्या बाजूची दुकाने विषम तारखेला सुरू हाेतील, असा नियम घालून दिला हाेता. मागील महिनाभर व्यापाऱ्यांनी त्याचे पालनही केले. मात्र, दुसऱ्यांदा १० जुलैपासूनच्या लाॅकडाऊनला पाठिंबा देताना व्यापाऱ्यांनी यापुढे सम-विषम (पी १- पी २) ही अट मागे घेण्याची विनंती केली हाेती. ती प्रशासनाने मान्यही केली. लाॅकडाऊन सुरू हाेण्याच्या तीन दिवस आधीपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. आता लाॅकडाऊन संपल्यानंतरही पी-१, पी-२ चा प्रयाेग राबवला जाणार नाही. व्यापारी राेजच दाेन्ही बाजूंची दुकाने उघडी ठेवू शकतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

१० जुलैपासून लाॅकडाऊन लावण्यास उद्याेजक व खासदार इम्तियाज जलील यांनी माेठ्या प्रमाणावर विराेध केला हाेता. मात्र, तरीही प्रशासन व इतर लाेकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर लाॅकडाऊन लावण्यात आला. ठाणे व इतर शहरात लाॅकडाऊनची मुदत वाढवली जात आहे, त्याची पुनरावृत्ती आैरंगाबादेतही हाेणार असल्याच्या साेशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याचे खंडन करताना जिल्हाधिकारी चाैधरी म्हणाले, ‘आता पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही. सध्या जो लॉकडाऊन आहे तोच कडक पाळण्याची गरज आहे.’ खासदार इम्तियाज जलील आणि खासदार डाॅ. भागवत कराड यांनीही पुन्हा लॉकडाऊन लावला जाणार नसल्याचे सांगितले. १७ जुलै राेजी सर्वांसाेबत बैठक घेऊन पुढील सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.

संचारबंदीचे पाचच दिवस : कटाक्षाने नियम पाळा

लाॅकडाऊनचे सुरुवातीचे चार दिवस नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. मात्र काही नागरिक विनाकारण भटकतात. मास्कचा वापरही करणे टाळतात. हे प्रकार थांबायला हवेत. पुढील पाच दिवस लाॅकडाऊन कटाक्षाने पाळावा तरच आपण काेराेना संसर्गाची साखळी ब्रेक करू शकताे, असे आवाहन मनपा प्रशासक व जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अनलाॅकनंतर सर्व बाजारपेठ पुन्हा सुरू हाेईल, त्या वेळी सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापरण करणे, व्यापाऱ्यांनी आॅक्सिमीटर व थर्मल गनने ग्राहकांची तपासणी करणे ही काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले.