आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय विश्वभारती कॉलनीतील घटना:शाळकरी मुलींचा पाठलाग करणाऱ्या 45 वर्षीय नराधमास जमावाचा चोप; आरोपीजवळ सापडले प्रेमपत्र, ग्रीटिंग्ज

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचेचाळीस वर्षांच्या विकृत पुरुषाने शाळकरी मुलींचा पाठलाग करून त्यांना प्रेमपत्र, ग्रीटिंग कार्ड देण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना जय विश्वभारती कॉलनीमध्ये शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. दोन दिवसांपासून हा नराधम पाठलाग करत हाेता, त्यामुळे सदर मुलींनी स्थानिकांना कळवले, शुक्रवारी जमावाने त्याला चांगलाच चाेप देऊन जवाहरनगर पाेलिसांच्या ताब्यात दिले. सुभाष बाळकृष्ण कुलकर्णी (४५) असे विकृताचे नाव आहे. त्याच्या बॅगमध्ये ग्रीटिंग कार्ड, प्रेमपत्र आढळून आले.

नेहा, राणी व साक्षी (नाव बदललेले आहे) या तिघी मैत्रिणी जवाहरनगर परिसरात राहतात. आठवी, नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या तिघी मैत्रिणी रोज सोबतच ट्यूशनला जातात. शुक्रवारी देखील त्या तिघी विश्वभारती कॉलनीतून जात असताना एका पुरुषाच्या संशयास्पद हालचाली त्यांच्या लक्षात आल्या. नेहाला सदर पुरुष मागील दोन ते तीन दिवसांपासून रोज त्यांच्या ट्यूशनला जाताना त्यांच्या मागे येत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे नेहाने हा प्रकार काॅलनीतील काही लाेकांना कळवला. शुक्रवारी सकाळी स्थानिकांनी त्याला अडवताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण लाेकांनी त्याला पकडून चोप देण्यास सुरुवात केली. संतापलेल्या नेहाने जवळच पडलेले लाकूड हातात घेतले व सुभाषला बदडणे सुरू केले.

बॅगमध्ये चक्क प्रेमपत्र, ग्रीटिंग कार्ड्स
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वेळेस सुभाषने जमावाच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जवळच असलेला एका मोठ्या घराची पाच ते सहा फुटांची सुरक्षा भिंत ओलांडून लपण्याचा प्रयत्न केला. तेथील केअर टेकर ज्ञानोबा भुत्ते यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत इतरांनीही त्याला ताब्यात घेतले व पुन्हा चोप दिली. तेव्हा त्याच्या बॅगेत मुलींच्या नावाने हाताने लिहिलेले प्रेमपत्र, ग्रीटिंग कार्ड आढळल्याने जमावाचा संताप अनावर झाला. जमाव नियंत्रणा बाहेर जात असल्याचे लक्षात येताच ज्ञानोबा व इतरांनी मात्र त्याची सुटका केली व जवाहरनगर पाेलिसांच्या तावडीत दिले.

केवळ तंबी, गुन्हा दाखल नाही
मूळ नाशिकचा व अविवाहित असलेला सुभाष मागील दहा वर्षांपासून जवाहरनगर परिसरातील कॉट बेसिस होस्टेलमध्ये वास्तव्यास आहे. ताे एका इलेक्ट्रिक दुकानात काम करतो. जमावाने त्याला जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पाेलिसांनी त्याची चौकशी केली. मुली व त्यांच्या कुटुंबांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, घटनेची दखल घेत पोलिसांनी तत्काळ नोंद घेत सुभाषवर प्रतिबंधात्मक कारवाई करून नोटीस बजावल्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...