आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना लसीचे दोन किंवा एक डोस घेतला असला तरी ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवे आदेश गुरुवारी दिले. दोन लस घेतलेल्यांनी दरमहा, एक डोस घेतलेल्यांनी दोन आठवड्यांनी तर एकही डोस न घेणाऱ्यांनी दर आठवड्याला आरटीपीसीआर चाचणी करावी, असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ओमायक्रॉनची प्रसारक्षमता लक्षात घेता त्याचा संसर्ग रोखावाच लागेल. त्यासाठीच्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून दोन डोस घेतलेल्या व्यक्तीची प्रत्येक महिन्याला, एक डोस घेतलेल्याची दर १५ दिवसाला आणि एकही डोस न घेणाऱ्याची प्रत्येक आठवड्याला आरटीपीसीआर तपासणी करण्यात यावी. लस न घेणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, शिक्षण संस्थांतील कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी अत्यंत बंधनकारक आहे. दुसरा डोस न घेणाऱ्यांना शाळा, महाविद्यालयात पाऊलही ठेवू देऊ नका. तेथे पोलिस बंदोबस्तात अँटिजन, आरटीपीसीआर तपासणी मोहिमेचे आयोजन करा. विद्यार्थ्याने लस घेतल्याची खात्री पटल्यावरच त्याचा प्रवेश, शिष्यवृत्ती किंवा दुसरा कोणताही अर्ज स्वीकारा, असे त्यांनी बजावले.
व्हॅक्सिनेशन ऑन व्हील, व्हॅक्सिनेशन ऑन डिमांड उपक्रमात लवकरच मोबाइल व्हॅन घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहे. लसीकरण किंवा चाचणी-तपासणी मोहिमेत दिरंगाई, टाळाटाळ करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही चव्हाण यांनी दिला. बैठकीला जि. प. अध्यक्ष मीनाताई शेळके, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. प्रदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.