आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादर एक लाख लोकसंख्येमागे राष्ट्रीयीकृत बँकांच्या १४ शाखा असणे अपेक्षित आहे. मराठवाड्यात लोकसंख्येच्या तुलनेत तब्बल ६३४ बँकांची कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. येत्या २८ फेब्रुवारी रोजी औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय बँकिंग कमिटीची बैठक घेतली जाईल. या बैठकीस सर्व बँकांचे राज्याचे प्रमुख उपस्थित राहतील, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी एका कार्यक्रमात दिली.
शहरातील उद्योजकांच्या विविध संघटनांच्या वतीने अर्थसंकल्पावर बोलण्यास डॉ. कराड यांना निमंत्रित केले होते. शुक्रवार, १८ फेब्रुवारी रोजी संत एकनाथ रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. या वेळी आमदार हरिभाऊ बागडे, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सीएएचे विभागीय अध्यक्ष रमण आजगावकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल, मसिआचे किरण जगताप, वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष वसंत वाघमारे, सीए असोसिएशनचे योगेश अग्रवाल, क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया, मिलिंद थोरात, रवींद्र वैद्य, रणजित कक्कड यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ‘मॅजिक डिस्कव्हर’ या उद्योजकीय त्रैमासिकाचे प्रकाशनही डॉ. कराड यांच्या हस्ते झाले.
पुढील २५ वर्षे डोळ्यासमोर ठेवून तयार झाला अर्थसंकल्प
यावर्षीचा देशाचा अर्थसंकल्प ३९ लाख ४५ हजार कोटी रुपयांचा आहे. मागील वर्षीचा अर्थसंकल्प ३५ लाख ३६ हजार कोटी रुपयांचा होता. तर २०१४ मध्ये केवळ १६ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. यातून आपली अर्थव्यवस्था किती मजबूत होत चालली आहे, हे लक्षात येईल. पुढील २५ वर्षे डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात तरतुदी केलेल्या आहेत. मोदींच्या सूचनेनुसार अर्थसंकल्पात गती-शक्ती मास्टर प्लान समाविष्ट केला आहे. यामध्ये रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, जलवाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक आदी सात विभागांसाठी तब्बल ३ लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. सध्या देशात प्रतिदिन ४० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे. ही आजवरची सर्वाधिक गती आहे.
दोन मार्चला सीएनजी, पीएनजी गॅसचे भूमिपूजन
औरंगाबाद शहराला वाहनांसाठी सीएनजी आणि पीएनजी गॅस पुरवठ्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते २ मार्च रोजी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर होणार आहे. शहरातील वाहनांना आणि घरगुती वापराचा गॅस स्वस्तात पुरवण्यासाठी हा प्रकल्प असल्याचे डॉ. कराड यांनी या वेळी स्पष्ट केले.
असा तयार होतो अर्थसंकल्प
डॉ. कराड यांनी सुरुवातीलाच अर्थसंकल्प कसा तयार केला जातो याचा उलगडा केला. अर्थसंकल्पाची तयारी सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाली होती. केंद्राच्या सर्व विभागांचे सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव यांच्याकडून त्यांच्या विभागांना, राज्यांना काय हवे याची माहिती घेतली. त्यानंतर उद्योजक, बँका, व्यापारी आदी १६ घटकांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर सर्व राज्यांचे अर्थमंत्री, मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. या माध्यमातून कोणत्या घटकाला काय अपेक्षित आहे, हे समजते आणि त्यानंतर अर्थसंकल्पात तरतूद केली जाते.
नव्या योजनेची गती कमी
केंद्र शासनाने जल जीवन मिशन हाती घेतले आहे. प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, आपल्या औरंगाबादमध्येच आठ दिवसाला पाणी येते. नव्याने मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेची गती अत्यंत कमी आहे. जायकवाडी धरणात जिथे उद्भव आहे, तेथील परवानगी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. मात्र, अद्याप संबंधित विभागाने या परवानगीसाठी अर्जच केलेला नाही. मी महापौर असताना २१ जलकुंभ उभारले. मात्र, ते जलकुंभ आजही कोरडे आहेत, अशी खंत डॉ. कराड यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.