आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनवाबनवी:वीस एमएलडी पाणीवाढीच्या घोषणेला मिळाली जलसमाधी; आठ महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांनी दिले होते आदेश

मंदार जोशी | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • २८ जून २०२१ रोजी देसाई यांनी जाहीर भाषणात केला होता उल्लेख

आठ महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मनपा निवडणुकीवर डोळा ठेवून शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ करा, किमान दोन दिवसाआड पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी सूचना केली.

२८ जून २०२१ रोजी सरदार वल्लभभाई पटेलांच्या शहागंजातील पुतळा अनावरण सोहळ्यातही त्यांनी आठवड्यातून दोनदा पाणी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची घोषणा केली. मात्र, त्या दिशेने काहीही ठोस प्रयत्न होत नसल्याने या घोषणेला जलसमाधी मिळाली आहे. या उन्हाळ्यातही १५ लाख औरंगाबादकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

तज्ज्ञांच्या मते जायकवाडीतून औरंगाबादेत पाणी आणणाऱ्या ७००, १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची वहनक्षमता संपली आहे. त्यामुळे त्यातून २० एमएलडी पाणी आणण्याचा प्रयत्न म्हणजे जलवाहिनी फुटीला निमंत्रण देणे आहे. म्हणून नवीन पाणीपुरवठा योजनेतील काही किलोमीटर पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा वाढवण्याचे ठरले. पण जायकवाडी ते नक्षत्रवाडी नवीन पाइप टाकणे पुढील एक महिन्यात सुरू होण्याची शक्यता नाही.

सध्या काय आहे परिस्थिती
शहराला सध्या २२० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडीतून १४७ एमएलडी (दशलक्ष लिटर) उपसा होताे. प्रत्यक्षात जागोजागी गळती, चोरीमुळे ९० ते ९५ एमएलडी शहरात येते. १९९८ मध्ये ६७ कोटी रुपये खर्चून ६७ एमएलडी पाणी वाढवण्याची योजना आखली गेली. त्याच वेळी जलवाहिन्या वाढीव भार सहन करून शकणार नाहीत, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाकडून सांगण्यात आले होते.

त्यामुळे २३ वर्षांपूर्वी जे शक्य झाले नाही ते आता कसे होऊ शकते, याबाबत तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली. मात्र, ही वस्तुस्थिती पालकमंत्र्यांपर्यंत स्पष्ट शब्दांत पोहोचलीच नाही. त्यामुळे त्यांनी घोषणा केली आणि त्यावरून अद्याप तरी माघार घेतलेली नाही.

एमआयडीसी, ऑरिकचा पर्याय
जायकवाडी येथून एमआयडीसी आणि ऑारिकने स्वतंत्र पाइपलाइन टाकली आहे. शेंद्रा आणि बिडकीनसाठी ७२ एमएलडी पाण्याचा उपसा होत आहे. सध्या ऑरिक सिटीचे काम पूर्ण सुरू झाले नाही. त्यामुळे यातील काही एमएलडी पाणी तात्काळ शहरासाठी मिळू शकते. हर्सूल, जटवाडा रोड, मयूर पार्कसाठी हर्सूल तलावाचे पाणी वापरता येऊ शकते. जटवाडा रोडवरील जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने वापरल्यास या भागातील प्रश्न मिटू शकतो. पालकमंत्र्यांकडे उद्योग मंत्रालयही असल्याने ते एमआयडीसीकडून उसने पाणी आणू शकतात.

प्रयत्न सुरू आहेत
सध्याच्या जलवाहिनीची क्षमता पाहता त्यावर अजून किती दाब द्यायचा याचा अभ्यास करावा लागेल, असे आठ महिन्यांनंतर मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, मनपाला १५व्या वित्त आयोगातून ६३ कोटी ५१ लाख रुपये मिळाले. त्याचा वापर पाणी वाढवण्यासाठी करू, असे त्यांनी यापूर्वीच सांगितले. नवीन पंप खरेदी, ढोरकीन, ज्युबिली पार्क, गारखेडा आणि हनुमान टेकडी येथील जलकुंभासाठी प्रत्येकी नवीन पंप बसवणे, फारोळा येथील जुन्या जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

फारोळ्यातील गाळणी हौदाची दुरुस्ती करून त्यातील विशिष्ट वाळूचा थर बदलला जाणार आहे. क्रांती चौकातील ११ लाख व २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभांची दुरुस्ती होणार आहे. वितरण व्यवस्थेतील व्हॉल्व्हही बदलला जाणार आहे. जलवाहिनीचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घेऊ, असे पांडेय यांनी ३१ डिसेंबर रोजी सांगितले. प्रत्येक दौऱ्यात आश्वासने, तरीही अजून हालचाली नाहीत

पालकमंत्री म्हणाले होते, २ दिवसांआड पाणी देणार
२८ जूनच्या भाषणात पालकमंत्री देसाई म्हणाले होते की, काही महिलांनी पाण्याचा प्रश्न माझ्यासमोर मांडला. त्यात काही शिवसैनिक महिलाही होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून या शहरातील माता-भगिनी पाण्याचा त्रास सहन करता आहेत. हा त्रास संपण्यासाठी आपण नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या योजनेच्या कामावर कायम लक्ष ठेवून असून नेहमी याबाबत विचारतात. मात्र ही योजना पूर्ण होण्यापूर्वी शहरात पाणीपुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किमान दोन दिवसांआड शहरात पाणीपुरवठा करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...