आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Metro | Marathi News | Aurangabad Come Metro Railway | Announcement Of Two Metro Routes, One DPR Mandate; The Announcement Made By Smart City Without Any Discussion

घोषणांचे इमले जमिनीवर:घोषणा मेट्रोच्या दोन मार्गांची, डीपीआर कार्यादेश एकाचाच; चर्चेविना केलेली घोषणा स्मार्ट सिटीने ठेवली ‘यार्डा’तच

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांनी नितीन गडकरींशी चर्चेविना केलेली घोषणा स्मार्ट सिटीने ठेवली ‘यार्डा’तच

डीएमआयसी शेंद्रा ते पंढरपूर-वाळूज आणि बिडकीन ते हर्सूल अशा दोन मार्गांवर मेट्रो रेल्वे लाइन सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी (११ जानेवारी) केली. महापालिकेची फक्त डीएमआयसी शेंद्रा - पंढरपूर मार्गाची तयारी असताना दुसरी लाइन होण्याची शक्यता ऐकून १५ लाख औरंगाबादकर भारावून गेले. मात्र, स्मार्ट सिटीने शुक्रवारी फक्त डीएमआयसी शेंद्रा ते पंढरपूर वाळूज याच मार्गाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प आराखडा) तयार करण्याचा कार्यादेश काढला.

हा नेमका काय प्रकार आहे, अशी विचारणा केली असता डॉ. कराड म्हणाले की, बिडकीन ते हर्सूल मार्गासाठी मी अद्याप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चाच केलेली नाही. त्यामुळे या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचा कार्यादेश निघाला नसावा. गडकरींशी चर्चेनंतरच लवकरच दुसऱ्या मार्गाचा निर्णय होईल.

डीएमआयसी शेंद्रा ते पंढरपूर वाळूज मेट्रोसाठीचा डीपीआर महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशनला करणार आहे. तसा करार स्मार्ट सिटीचे प्रमुख व मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महामेट्रोसोबत शुक्रवारी (१४ जानेवारी) मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर केला. सहा कोटी ५५ लाख रुपये खर्चून हा डीपीआर तयार होईल. पांडेय यांनी डीपीआरसाठी एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता तो स्मार्ट सिटीकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत ११ जानेवारीला मेट्रो व शहरातून एकच उड्डाणपूल करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.

वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसी जोडण्यासाठी मेट्रो रेल्वे, उड्डाणपुलाचा डीपीआर व शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (सीएमपी) तयार करण्याचे काम महामेट्रोला देण्याचे ठरले. यातील पाच कोटी रुपये स्मार्ट सिटी खर्च करेल. तसेच बिडकीन ते हर्सूल अशी नवीन मेट्रो लाइन होईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले. प्रत्यक्षात त्याबद्दल त्यांनी गडकरींशी चर्चाच केलेली नाही. त्यामुळे दुसरा मेट्रो मार्ग सध्या तरी अधांतरी आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी पांडेय यांची सही झाल्यानंतर रात्री मेलद्वारे डीएमआयसी शेंद्रा ते पंढरपूर- वाळूज मेट्रोसाठी नागपुरातील महामेट्रो कार्यालयाला कार्यारंभ आदेश पाठवण्यात आला. येत्या नऊ महिन्यांत डीपीआर तयार होईल, अशी अपेक्षा आहे.

६.५५ कोटी खर्च : महामेट्रो ९ महिन्यांत करणार डीपीआर
प्रस्तावित मेट्रो रेल्वेसाठी औरंगाबादच्या पहिल्या सहापदरी, दोनमजली पुलाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यावरून वाहने आणि मेट्रो एकाच वेळी धावेल. यासाठी सीएमपी (कॉम्प्रेसिव्ह मोबॅलिटी प्लॅन) तयार करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी पाच लाख रुपयांची तरतूद आहे. तो चार महिन्यांत तयार होईल. एएआरसाठी (अल्टरनेटिव्ह अॅनॅलिसिस रिपोर्ट) सहा महिन्यांचा कालावधी दिला असून ५० लाख रुपयांचे नियोजन आहे. डीपीआरसाठी नऊ महिने लागतील. त्यावर पाच कोटी रुपये खर्च होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...