आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळात मराठवाडा:औरंगाबादेतील म्हाडा भरती परीक्षेची चौकशी, भोकरदनला नवे जलशुद्धीकरण केंद्र

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेतील म्हाडा भरती परीक्षेची चौकशी सुरूच
औरंगाबाद :
फेब्रुवारी २०२२ मध्ये औरंगाबाद येथे म्हाडा ऑनलाइन भरती परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आला. त्याची अजूनही चौकशीच सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले आहे. आमदार राम सातपुते यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांंनी म्हटले आहे की, टीसीएस कंपनीने म्हाडाला सादर केलेल्या अहवालानुसार संगणकाची जागा बदलण्यात आली. तथापि, संगणकीय अंतर्गत प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात मोरया इन्फोटेकचे मालक महेश शिंगारे, पर्यवेक्षक प्रवीण चव्हाण, विनोद चव्हाण तसेच परीक्षार्थी अनिल राठोड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस चौकशी सुरू आहे.

कोल्हा ते झीरो फाटा हायवेची वर्कऑर्डर कल्याण ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग परभणी जिल्ह्यातील कोल्हा ते झीरो फाट्यापर्यंत पाच वर्षांपासून रखडला आहे. या विषयी डाॅ. राहुल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे की, या कामाची वर्कऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम ७ जून २०२२ पूर्वी पूर्ण करावे अन्यथा कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा १३ मार्च २०२२ रोजी नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिला होता. त्यानंतरही कासवगतीनेच हालचाली होत आहेत, असे चव्हाण यांच्या उत्तरावरून स्पष्ट होते. दरम्यान, जालना-औरंगाबाद महामार्गावरील डांबरीकरणाच्या नूतनीकरणाचे काम १ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू होऊन ३१ मार्च २०२२ रोजी पूर्ण झाल्याचेही चव्हाण यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. या संदर्भात नारायण कुचे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

भोकरदनला नवे जलशुद्धीकरण केंद्र भोकरदन येथे नवे जलशुद्धीकरण केंद्र, नवी जलवाहिनी प्रकल्प योजना राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष दानवे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे. अनेक वर्षांपासून भोकरदनवर प्रभाव असलेल्या दानवे यांनी भोकरदनमध्ये पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरील उत्तरात शिंदे यांनी म्हटले आहे की, जुई धरणातील १४ टक्के पाणीसाठा पाहता, ५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरात एकूण ११० हातपंप असून सर्व कार्यान्वित आहेत. प्रत्येक दोन ते तीन घरानंतर खासगी बोअरवेल असल्याने भटकंती करावी लागत नाही. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी सिल्लोड भोकरदन संयुक्त पाणीपुरवठा योजनेमधून नवीन जलशुद्धीकरण केंद्र मंजूर असून, सदर योजनेचे काम लवकरच सुरू करण्यात येत आहे. २५ वर्षे जुनी पाणी योजना पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी नवीन जलवाहिनी प्रकल्प तयार करण्याची प्रक्रिया नगर परिषद स्तरावर सुरू आहे.

अंबाजोगाईच्या मुख्याधिकाऱ्यांवर ठपका अंबाजोगाईत शहा मशीद ते जयवंती नदीपर्यंत जुन्याच नालीवर सिमेंटचा थर देण्यात आला. नगर परिषदेच्या आपत्कालीन निधीमधून अंदाजपत्रक तयार करून मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी संगनमताने सुमारे २० लाख ३१ हजार ६१४ रुपयांचा गैरव्यवहार केला. त्यांची विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी सुरू आहे, असे नमिता मुंदडा यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...