आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad | MIM MP Imtijaz Jalil And Shivsena Minister Abdul Sattar Meet | MP Imtiaz Seeks Blessings; Sattar Says, 'Our Flag Is Saffron, Heart Is Green' | Marathi News

देणे-घेणे:खासदार इम्तियाज यांनी मागितला आशीर्वाद; सत्तार म्हणाले, ‘आमचा झेंडा भगवा, दिल हराभरा’

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी असल्याची चर्चा
  • नेहरू भवन भूमिपूजन सोहळ्यात खासदारांवर उधळली कौतुकाची फुले

स्मार्ट सिटीतून अनेक विकासकामे सुरू आहेत. शहराचे सध्या अच्छे दिन आहेत. २०२४ नंतरही अब्दुल सत्तार यांची अशीच कृपा राहिली तर असे दिवस कायम राहतील, अशी आशीर्वादवजा अपेक्षा एमआयमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. त्यावर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असला तरी दिल हराभरा आहे,’ असे सूचक वक्तव्य केले. सुभाष झांबड आणि राजेंद्र दर्डा एकत्र येत असतील तर इम्तियाजने आमचा बांध कापला का, असाही सवाल केला. येणारी लोकसभा इम्तियाज लढणार नाहीत. त्याएेवजी ते औरंगाबाद पूर्व किंवा मध्यमधून लढतील, असे म्हटले जाते. तोच संदर्भ समोर ठेवून इम्तियाज आणि सत्तार यांनी पेरणी सुरू केली, असा अंदाज आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी असल्याची चर्चा सुरू झाली.

नेहरू भवन इमारतीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन २५ फेब्रुवारी रोजी दुपारी झाले. त्या वेळी इम्तियाज आणि सत्तार यांनी एकमेकांच्या कौतुकाचे पूल बांधले. नेहरू भवन, वंदे मातरम सभागृह, हज हाऊसच्या कामासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या पुनर्विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी खासदारांनी सत्तार यांच्याकडे केली. त्याला सत्तारांनी हिरवा कंदील दाखवला. या वेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी, जमीर कादरी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, नगररचना उपसंचालक ए. बी. देशमुख, उपायुक्त संतोष टेंगळे, आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, उपअभियंता अनिल तनपुरे आदींची उपस्थिती होती. संजीव सोनार यांनी सूत्रसंचालन केले. काजी जावेद यांनी आभार मानले.

३२ कोटींचा अंदाज : ४८०० चौरस मीटर नेहरू भवनाच्या पुनर्विकासासाठी ३२ कोटी १ लाख ९३ हजार रुपये लागतील, असा अंदाज आहे. हाय टेक इन्फ्रा कंपनी १८ महिन्यांत हे काम करेल, अशी अपेक्षा आहे. यात २० दुकाने, १२ कार्यालये, एक सभागृह, प्रदर्शन गॅलरी, भव्य पार्किंग असेल.

कौतुकाचे पूल.. : इम्तियाज, प्रशासक पांडेय यांचे मनसोक्त कौतुक करत सत्तार म्हणाले, कहाँ किसका नाक दबाना, किसका मूँह खोलना, उनको अच्छी तरह मालूम है!’, लोकसभा निवडणुकीत ते लंगड्या घोडीवर बसूनही जिंकले. त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे तर माझ्याकडे सत्तेचे लायसन्स आहे. आस्तिककुमार एका हाताने आयुक्ताची तर दुसऱ्याने प्रशासकाची सही करतात. त्यामुळे कामांची गती वाढली आहे.

मी जिकडे जातो तिकडे सत्ता
माझ्या आडनावातील ‘र’ काढले तर ‘सत्ता’ शब्द उरतो. त्यामुळे मी जिकडे जातो तिथे सत्तेत असतो, असे सत्तार म्हणाले. माजी महापौर नंदकुमार घोडेलेंनी हिरव्या रंगाचे जॅकेट घातले होते. त्याचा उल्लेख करत ‘माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असला तरी दिल हरभरा है’ असे ते म्हणाले. वंदे मातरम सभागृह, हज हाऊससाठी निधी देऊ. संशोधन केंद्राच्या नूतनीकरणासाठी किती निधी लागतो ते सांगा. सिल्लोडमधील थोडा निधी कमी करून पैसे देतो, असे आश्‍वासन सत्तार यांनी दिले. शिवसेनेत असूनही मला औरंगाबाद म्हणण्याची मुभा देण्यात आली आहे. माझा रिमोट कोणाच्याही हातात नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

बातम्या आणखी आहेत...