आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांना रविवारी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. रस्ते जलमय झाल्याने वाहतूक पूर्णपूणे ठप्प झाली हाेती. औंढा नागनाथ तालुक्यातील असोला ते गोळेगाव मार्गावरील पुलावरून वाहणाऱ्या पुरात कार वाहून गेली. यात औरंगाबादच्या पडोळ कुटुंबातील दोघे जण वाहून गेले, तर दोघे बचावले. रविवारी (दि.११) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. वाहून गेलेल्या आई व मुलाचा शोध सुरू आहे.
औरंगाबादच्या सातारा परिसरातील रहिवासी योगेश रामराव पडोळ, पत्नी वर्षा (३७), मुलगा श्रेयन (३) हे कारने (एमएच २० सीएस १८७२) औंढा तालुक्यातील पोटा शेळके व असोला येथे गेले होते. सोबत वर्षा यांचे मावस भाऊ रामदास शेळके हेही होते. नातेवाइकांना भेटून ते रात्री कारने परत औरंगाबादकडे निघाले होते. दरम्यान, असोला ते गोळेगाव मार्गावर मुसळधार पावसामुळे असोला ओढ्याला पूर आला. पाण्याचा अंदाज पडोळ यांना आला नाही. त्यांनी कार पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कार पुढे जात नसल्याने चौघेही उतरले. मात्र पाण्याचा प्रवास जास्त असल्याने योगेश, वर्षा व श्रेयन वाहून गेले. योगेश पुढे काही अंतरावर एका झाडाला अडकले, तर शेळके पोहत बाहेर पडले. मात्र, वर्षा व श्रेयन वाहून गेले. रामदास यांनी गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, सपोनि गजानन मोरे, उपनिरीक्षक संदीप थडवे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
दाेरीच्या साहाय्याने काढले बाहेर
पोलिस व गावकऱ्यांनी दोरीच्या साहाय्याने योगेश पडोळ यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, वर्षा व श्रेयन यांचा शोध सुरू होता. या घटनेतील कार मात्र अद्यापही पाण्यातच असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत आई-मुलाचा शोध लागला नव्हता.
औरंगाबाद जिल्ह्यातही उशिरा आगमन
रविवारी सायंकाळी औरंगाबाद शहरात तुरळक पावसाला सुरुवात झाली. रात्री साडेअकरानंतर पावसाने जोर धरला. रात्री सव्वाबाराच्या सुमारास काही वेळ दमदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत संततधार सुरू हाेती. १२ वाजेपर्यंत ११.४ मिलिमीटर पावसाची एमजीएम वेधशाळेत नाेंद झाली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.