आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद शहरातील नशेच्या गोळ्या विक्री, खरेदी करणारे व त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी थेट पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनात विशेष पथक स्थापन करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
विशेष म्हणजे शहरातील अनेक पोलिस स्टेशनच्या हद्दीत नशेच्या गोळ्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे सुरु असून संबंधित पोलिस स्टेशनमधील काही अधिकारी व कर्मचारी यांना त्याची संपूर्ण माहिती आहे. तरीसुद्धा पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. हि बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. संबंधित पोलिस स्टेशनच्या अनेक अधिकारी व कर्मचारी यांचे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांसोबत आर्थिक संबंध असल्याची चर्चा सुद्धा शहरात सुरु असल्याचे समजते. त्यामुळे पोलिस विभागाची प्रतिमाही मलीन होत असल्याचे जलील यांनी म्हटले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबाद शहरातील अनेक अल्पवयीन मुले व तरुणाई नशेच्या आहारी गेल्याने मागील काही दिवसापासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून किरकोळ कारणावरून हत्या झालेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात वाढलेली गुंडगिरी आणि गुन्हेविषयक घटनांमागे नशेखोरांचे प्रमाण जास्त असल्याचे अनेक वेळा सिद्ध झालेले आहेत. नशेखोरीमुळे शहराचा गुन्हेगारीचा आलेख तेजीत वाढत असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आधी नशेबाजांवर लगाम घालणे अत्यावश्यक झालेले आहे.
औरंगाबाद शहरात विविध गल्ल्यामध्ये औषध विक्रेत्याकडून नशेखोरीच्या गोळ्या मिळत असल्याचे अनेकदा माध्यमामधून प्रसारित झालेले आहे. शहरातील अनेक भागात छुप्या मार्गाने काही टोळ्या आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गल्लीबोळातील अनेक औषध विक्रेत्याकडून बटण, ऑरेंज आणि किटकॅट च्या नावाखाली झोपेच्या गोळ्याचा डोस देण्याचे उद्योग सर्रासपणे सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. नशेच्या गोळ्या मुळे अनेक जणांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालेले असून अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.