आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIM आक्रमक:राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा, जलील यांची मागणी; अन्यथा त्याच मैदानावरून सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा इशारा

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर आता एमआयएमनेही आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. औरंगाबादेत मुस्लिम समाजाविषयी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एमआयएमचे औरंगाबाद खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. राज्य सरकारने राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला नाही तर राज ठाकरेंनी ज्या मैदानात सभा घेतली त्याच मैदानात एमआयएम त्यापेक्षा मोठी सभा घेईल व राज ठाकरेंना रोखठोक प्रत्युत्तर देईल, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

राज ठाकरेंची 'ती' लायकी राहिली नाही!
दरम्यान, औरंगाबादच्या सभेपुर्वी इम्तियाज जलिल यांनी राज ठाकरेंना इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित केले होते. मात्र, राज ठाकरेंनी त्याची दखल घेतली नाही. याविषयी इम्तियाज जलिल यांना विचारले असता ते म्हणाले, आता राज ठाकरेंना इफ्तारसाठी बोलवण्याची त्यांची लायकी राहिली नाही. आपल्या प्रक्षोभक भाषणामुळे त्यांनी आपली लायकी दाखवून दिली आहे.

आम्ही वाट पाहत आहोत!
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा संपल्यानंतर तासाभरात त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मात्र, अद्याप पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. एवढे प्रक्षोभक भाषण केल्यानंतरही सरकार अद्याप गप्प का, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला. गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. भविष्यात मनसेसोबत जायची वेळ आल्यास अडचण नको, म्हणूनच राष्ट्रवादीकडून कारवाई केली जात नाही का, असादेखील सवाल त्यांनी केला. तसेच, आता लवकरात लवकर गुन्हा दाखल न झाल्यास आम्हीदेखील त्याच मैदानावर, त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ. तेव्हा आमच्यावर कारवाई करण्याचा सरकारला अधिकार असणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आईच्या आठवणीने जलील भावूक
दरम्यान, आज देशभरात ईद साजरी केली जात आहे. औरंगाबादमध्येदेखील इदगाह मैदानावर उत्साहात ईद साजरी करण्यात आली. मैदानात खासदार इम्तियाज जलील यांनी सर्वसामान्यांसह नमाज अदा केली. यावेळी आईच्या आठवणीने जलील भावूक झाले. दोन महिन्यांपुर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर सर्वांसोबत ईद साजरी करत आहे. मात्र, आज आई आपल्यासोबत नाही, हे सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

दोन वर्षांत अनेक लोक गमावले
कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांत अनेक लोक गमावले. दोन वर्षांनंतर आज प्रथमच सर्वांसोबत ईद साजरी करत आहे. त्यामुळे यंदाची ईद ही विशेष आहे. मात्र, प्रथमच आईशिवाय ईद साजरी करत आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. यावेळी सर्व देशवासियांना ईदच्या शुभेच्छा देत आपण सर्व जनतेच्या शांती व भल्यासाठी प्रार्थना केली. ईस्लाममध्ये भेदाला थारा नाही. माणुसकी हाच ईस्लामचा धर्म असल्याचे पैगंबरांनी सांगितले आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

सध्या देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न
गेल्या 70 वर्षांपासून देशात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. मात्र, काही शक्तींकडून सध्या देशाला कमकुवत केले जात आहे. सर्वसामान्यांमध्ये असलेला बंधुभाव व एकतेला तडे देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मुस्लिमांना नमाज पठण करण्यापासून रोखले जात आहे. मशिदींना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप जलिल यांनी केला. तसेच, हा द्वेष संपावा व देशात बंधुभाव आणि खुशहालीचे वातावरण रहावे, यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली आहे, असे त्यांनी सांगितले. तसचे, देशाला एकसंध ठेवण्यासाठी मुस्लिम नेहमीच प्रयत्नशील राहतील, असेही जलिल म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...