आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता औरंगाबाद महानगरपालिका नव्हे तर छत्रपती 'संभाजीनगर महानगरपालिका':नामांतरानंतर आयुक्तांनी काढले परिपत्रक

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने औरंगाबाद शहराच्या नामांतराला मंजूरी दिल्यानंतर आता महानगरपालिकेचेही नाव बदलून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका करण्यात आले आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यामुळे आता नामफलकांवरही छत्रपती संभाजीनगर वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

केंद्राने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराच्या मागणीला परवानगी देताच राज्य सरकराने राजपत्र काढून दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलली आहे. दरम्यान महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी देखील औरंगाबाद महापालिकेचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे आता महापालिका मुख्यालयावर छत्रपती संभाजीनगर महापालिका असा फलक लावला जाणार आहे.

जलील यांचा विरोध

औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याबाबत जुनी मागणी होती. त्यानुसार 8 महिन्यांपूर्वी राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर ठेवण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर लगेचच राज्यात सत्तांतर झाले आणि नवीन सरकारने शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव घेऊन, तो केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यानंतर आता केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर नावास मंजुरी दिली आहे. मात्र या नावाला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे.

प्रस्तावास मंजुरी

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने राजपत्रात बदल प्रसिद्ध केला आहे. राजपत्र प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी देखील औरंगाबाद महापालिकेचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर महापालिका करण्यात येत असल्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. आणि आज याबाबत प्रशासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे.

कार्यालयीन परिपत्रक असे

याद्वारे सर्व विभाग प्रमुख / शाखा प्रमुख यांना कळविण्यात येते की, संदर्भिय अधिसूचनेद्वारे “औरंगाबाद महानगरपालिकेचे” नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका” असे करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिकेचे नियमित कार्यालयीन कामकाज करतांना आणि सर्व चल अचल मालमत्तांवरील नामफलकांवर “औरंगाबाद महानगरपालिका " ऐवजी "छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका” असा वापर सुरू करण्यात यावा.

बातम्या आणखी आहेत...