आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात प्रथमच:औरंगाबाद मनपा देणार तृतीयपंथीयांना नोकरी; तीन हजार तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांचा पुढाकार

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतर कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता रुजवण्यावर अाधी भर देणार

औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात अाला. जिल्ह्यातील ३ हजार तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनपा प्रशासक अास्तिककुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला. राज्याच्या पालिकांमध्ये हा पहिलाच प्रयाेग अाहे. बुधवारी मनपात या विषयावर झालेल्या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांनी तृतीयपंथीयांची बाजू मांडली. मनपाच्या उपायुक्त अॅड. अपर्णा थेटे, उपायुक्त नंदकिशोर भोंबे, स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी आणि अर्पिता शरद उपस्थित होते. ‘लिंग हक्क चॅम्पियन’ तेजस पांडे यांचीही उपस्थिती होती.

तेजस पांडे यांनी तृतीयपंथी समुदाय कसा राहतो, कसा जगतो, त्यांच्या जीवनातील अडचणी आणि वैद्यकीय अडचणींची माहिती दिली. तृतीयपंथीयांशी संबंधित शासकीय धोरण आणि भारत याबद्दल विस्तृत चर्चा झाली. औरंगाबादमधील तृतीयपंथी, त्यांच्यासमोरील आव्हाने या विषयावर रेणुका कड यांनी सखोल चर्चा केली. या समुदायाच्या सदस्यांची पात्रता आणि त्यांची कौशल्ये आणि त्यांच्या संभाव्य भूमिका यावेळी मांडण्यात अाल्या.

इतर कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता रुजवण्यावर अाधी भर देणार
तृतीयपंथीयांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. केवळ महापालिका किंवा स्मार्ट सिटीत काम देऊन त्यांचे पुर्नवसन होणार नाही. तर, त्यांना समाजात सामावून घेण्याकरिता मानसिता तयार करणे हे पहिले आणि महत्त्वाचे आव्हान आहे. आयुक्तांच्या आदेशाने नियुक्त्या तर होतील, पण जर मनपात काम करणाऱ्या स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांनी त्यांना अापलेसे केले नाही तर काही वर्षांनी ते सेवेतूनही बाहेर पडतील. त्यामुळे सर्वात अाधी इतर कर्मचाऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांबद्दल संवेदनशीलता निर्माण हाेईल यासाठी विशेष शिबिरांचे अायाेजन केले जावे, या प्रमुख मुद्द्यावर चर्चा झाली.
बुधवारी झालेल्या बैठकीस उपस्थित मनपाचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते.

मनपाचा निर्णय स्वागतार्ह
प्रत्येक प्रक्रिया आणि उपक्रमात तृतीयपंथीयांना सामावून घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. प्रामाणिक आणि चोख काम करणारा हा समुदाय आहे. राज्य सरकारपासून सर्वांनी त्यांच्याबद्दल सतत संवेदनशील असले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी भरतीत त्यांना संधी द्यायला हवी. अाैरंगाबाद मनपाचा हा निर्णय इतिहासात मोलाचा ठरेल. - मंगल खिंवसरा, सामाजिक कार्यकर्ती

प्रामाणिक आणि कष्टाळू समुदाय
तृतीयपंथी वर्षानुवर्षे बाजारात, सिग्नलवर पैसा मागून उदरनिर्वाह करत आले आहेत. त्यांना आपण शिक्षणापासून वंचित ठेवतो. समाजात सामावून घेत नाही, त्यामुळे त्यांना कष्ट करून उदरनिर्वाह करण्याऐवजी अशा पद्धतीने जगावे लागते. त्यांना समान संधी दिली तर हा समुदाय प्रामाणिक आणि कष्टाळू आहे हे अापल्या लक्षात येईल. - रेणुका कड, सामाजिक कार्यकर्ती

बातम्या आणखी आहेत...