आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडीत गुंडाळलेल्या त्या मृत तरुणाचा खूनच:हातउसन्या पैशांचा तगादा लावल्याने काढला काटा; तिघांना बेड्या; 6 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

कन्नड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड तालुक्यातील पेडेकवाडी घाटात पुलाच्या पाईपखाली साडीत गुंडाळलेल्या बेपत्ता सागर जैस्वाल याचा खूनच झाल्याचे निष्पन्न झाले. आता त्याच्या मारेकऱ्यांचाही शोध लागला असून त्यांना पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. सागरने हातउसने दिलेल्या पैशांचा तगादा आरोपींना लावला होता. त्यातून सागरचा संशयितांनी काटा काढल्याचे कारण समोर आले आहे. गुरुवारी सागरचा मृतदेह आढळला होता.

कन्नड ग्रामीण पोलीस व औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने सागर संतोष जैस्वाल यांच्या खुनाच्या गुन्हातील आरोपीच्या अवघ्या 24 तासात मुसक्या आवळत खुनाचा छडा लावला.

चोवीस तासात अटक

गुरुवारी दोन वाजता कन्नड पोलीस स्टेशनला फोन आला होता की, कन्नड तालुक्यातील पेडकवाडी शिवारातील पेडकवाडी ते कोळवाडी जाणारा रोडवरील पेडकवाडी घाटात म्हसोबा देवस्थाना जवळील पुलाच्या खालील नळ्यामध्ये साडी व प्लास्टिकच्या कव्हरमध्ये गुंडाळून टाकलेल्या व कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. तो मृतदेह दि. 20 नोव्हेंबर पासुन बेपत्ता असलेल्या औराळा येथील सागर संतोष जैस्वाल (21) याचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाची नातेवाईका समक्ष खात्रीही पटली होती.

खुनाचा गुन्हा दाखल

संबंधित मुलाचा खुनच झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर यात विनोद धन्नुलाल जैस्वाल (38) यांच्या फिर्यादीवरुन कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध भादंवि 302, 201 कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक विश्लेषणातून तपास

या गुन्ह्याचा उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक तातेराव भालेराव व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रिक विश्लेषणाद्वारे खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार, पंढरीनाथ परसराम वाघचौरे (28 रा. धनगरवाडी) काकासाहेब परसराम वाघचौरे (34 रा. धनगरवाडी), दिनेश उर्फ पप्पू संतराम साळुंखे (22 रा. कविटखेडा) यांनी पैशाच्या देणे घेण्याच्या वादावरून केलेला आहे.

तिघांनी दिली खुनाची कबुली

यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद आरोपीचा शोध घेतला असता आरोपी पंढरीनाथ वाघचौरे, काकासाहेब वाघचौरे, दिनेश उर्फ पप्पू साळुंखे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली व त्यांनी खुनाची कबुली दिली.

अपमान सहन न झाल्याने...

मृत सागर जैस्वाल यांच्याकडून पंढरीनाथ वाघचौरे व दिनेश उर्फ पप्पू साळुंखे यांनी पैसे हात उसने घेतले होते. सागर जैस्वाल हा नेहमी यांच्याकडे चार चौघात उसनवार घेतलेल्या पैशाची मागणी करत त्याचा अपमान करत होता. त्यामुळे त्यांनी सागर जैस्वाल याचा काटा काढण्याचा बेत आखला.

असा केला खून

सागरला पैसे घेण्यासाठी पेडकवाडी शिवारात संशयितांनी बोलविले व तेथे त्यांनी लोखंडी हातोडी व दगडाने डोक्यात मारून त्याला तिथेच ठार केले. त्याचे प्रेत पेडकवाडी घाटातील पाईप मध्ये टाकून दिले होते. त्याचे गळ्यातील सोन्याची चैन, हातातील सोन्याच्या अंगठ्या, व कानातील बाळी काढून घेतली अशी कबुली संशयितांनी पोलिसांना दिली. आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी पोलिस ठाणे कन्नड ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक तातेराव भालेराव करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, सागरसिंग राजपूत आदींनी केली.

बातम्या आणखी आहेत...