आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारापुल्ला गेटजवळील घटना:खुनातील आरोपीला दगडाने ठेचले; भांडण झाल्याचे सांगून मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या युवकाची हत्या

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सात वर्षांपूर्वी कुख्यात मारेकरी बबला गँगने केलेल्या हत्येत हाेता माजिदचा सहभाग

भांडण झाल्याचे वडिलांना सांगून शुक्रवारी मध्यरात्री संतापाच्या घराबाहेर पडलेल्या २८ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. बारापुल्ला गेटजवळील मिलिंद महाविद्यालयाच्या मागील नाल्यात शनिवारी (२९ मे) दुपारी तीन वाजता स्थानिक रहिवाशांना त्याचा मृतदेह आढळून आला. शेख माजिद ऊर्फ मुर्गी शेख अली (२८, रा. शासकीय रुग्णालयाजवळ, खडकेश्वर) असे मृताचे नाव आहे. २०१४ मध्ये कुख्यात मारेकरी बबलाच्या गँगने हिमायतबागेत एक निर्घृण खून केला होता. त्यात माजिदचा सहभाग होता. सध्या तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. घटनास्थळी सापडलेल्या मोबाइलमधील कॉल्सवरून पाेलिसांनी मारेकऱ्यांचा शाेध घेणे सुरु केले आहे.

घर, इमारतींना रंग देण्याचे काम करणारा माजिद हा वडील, पत्नी, आई, मुलासह खडकेश्वर भागात राहत होता. त्याचे वडील मजुरी करतात. मोठा भाऊ दुबईला होता. दीड वर्षापासून तो औरंगाबादेतच वास्तव्यास आहे. २८ मे रोजी सायंकाळी माजिद मध्यरात्री घरी गेला. “माझे भांडण झाले आहे. मला १०० रुपये पाहिजेत,’ असे सांगून त्याने वडिलांकडून पैसे घेतले आणि संतापाच्या भरातच घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. शनिवारी बारापुल्ला गेटजवळील मिलिंद महाविद्यालयाच्या मागील परिसरात असलेल्या नाल्यात चेहरा, हात ठेचलेला मृतदेह लोकांना दिसला.

त्यांनी ही माहिती छावणी पोलिसांना कळवली. प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, निरीक्षक मनोज पगारे, उपनिरीक्षक सचिन वायाळ व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळपर्यंत फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी घटनास्थळी तपास करत होते. श्वानपथकालादेखील पाचारण करण्यात आले होते. प्राथमिक तपासात मृतदेह माजिदचा असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

मिल कॉर्नरच्या हॉटेलमध्ये रात्री नशेत वाद झाल्याचा संशय
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत माजिद शुक्रवारी रात्री मिल कॉर्नर परिसरातील एका हॉटेलमध्ये रात्री बारा वाजेपर्यंत होता. त्यानंतर तो घरी गेला व लगेच घराबाहेर पडला. मिल कॉर्नर येथील ‘त्या’ हॉटेलपासून बारापुल्ला गेटही जवळच असल्याने त्याचा हॉटेलच्या आसपासच वाद झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. माजिद नशेत असल्याचा प्राथमिक अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला.

घटनास्थळी अंगठी आणि मोबाइल
माजिदचा मृतदेह विनाशर्ट आढळून आला. त्याशेजारी गॅरेजचा पाना, अंगठी व मोबाइल सापडला. हल्ल्यात वापरलेले दगडही सापडले. श्वानपथकाने आराेपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती फार दूर गेली नाही. पोलिसांनी मोबाइल ताब्यात घेतला. घटनेच्या काही तास आधी माजिदने कुणाशी संपर्क केला, त्याला कुणाचे कॉल आले, याचा तपशील घेतला जात आहे.

अडीच वर्षे तुरुंगात होता
कुख्यात मारेकरी बबला गँगने काही वर्षांपूर्वी दौलताबाद घाटात एकाचा निर्घृण खून केला होता. गँगमधील मजाज लीडर पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय गँगला आला. त्यामुळे त्यांनी २०१४ मध्ये मजाजचा खून करून त्याचा मृतदेह नाल्यात पुरला. हे प्रकरण उघडकीस आल्यावर माजिदला अटक झाली. अडीच वर्षे तुरुंगात मुक्काम झाल्यावर त्याची जामिनावर सुटका झाली होती. सध्या ते प्रकरण काेर्टात आहे.

बातम्या आणखी आहेत...