आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलेल्या हल्लेखोरांचे क्रौर्य:आकाशला ठेचून मारले, त्याच्या मरणासन्न देहावर लघुशंका केली, व्हिडिओ व्हायरल; आरोपींच्या घरात तलवार, सुरे, कोयते सापडले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: नितीश गोवंडे
  • कॉपी लिंक
  • तालिबानीसारख्या क्रूर आरोपींना फाशी द्या : शोकाकुल राजपूत समाजबांधवांची पोलिसांकडे संतप्त स्वरात मागणी

९ ऑगस्ट रोजी हनुमाननगर, गारखेडा येथे रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश रवींद्र तनपुरे, ऋषिकेश तनपुरे, मंगल तनपुरे, राहुल युवराज पवार आणि संदीप त्रिंबक जाधव यांनी लोखंडी, लाकडी दांडक्याने ठेचून आकाश रूपचंद राजपूतला (२१) ठेचून मारले. अंगावर शहारा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात मरणासन्न अवस्थेत, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशवर आरोपीने लघुशंकाही केल्याचे दिसते. यामुळे राजपूत समाजबांधवांमध्ये संतापाची लाट उसळली असून तालिबानीसारख्या क्रूर आरोपींना फाशी द्या, अशी मागणी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. ७ ऑगस्ट रोजी आकाशच्या मित्रांचे तनपुरे गँगमधील गणेश, ऋषिकेशसोबत हुसेन कॉलनीत भांडण झाले. ९ रोजी या गँगला आकाश दुसऱ्या मित्रासोबत जाताना दिसला आणि त्यांनी त्याला घेरून हल्ला केला.

स्थानिकांच्या माहितीनुसार तनपुरे गँग अनेक वर्षांपासून सक्रिय असून येणाऱ्या-जाणाऱ्यांना मारहाण, मोबाइल, पैसे हिसकावणे असे उद्योग करते. मंगल तनपुरेवर जळगाव येथे एक फौजदारी, तर गणेशवर घरफोडी, चोरीचे चार, ऋषिकेशवर चोरी, हाणामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या नेतृत्वातील पथकाने या गँगच्या घराची झडती घेतली. त्यात तलवार, भाले, सुरे, कोयते, लोखंडी टॉमी सापडले. या गँगवर कठोर कारवाई करावी. फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन शिवराणा सेवा संघाचे अध्यक्ष एल. डी. ताटू, पद्मसिंह राजपूत, श्याम राजपूत, विनोद डोभाळ, मंगलसिंग राजपूत, जयसिंग सोवियेत, चंदन काहटे आदींनी दिले.

२० ऑगस्टपर्यंत कोठडी
व्हायरल झालेले व्हिडिओ न्यायालयासमोरही सादर केले. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी आरोपींची पोलिस कोठडी २० ऑगस्टपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले. सहायक सरकारी वकील गौतम कदम यांनी सरकारची बाजू मांडली.

माजलेल्या हल्लेखोरांचे क्रौर्य
आधी लोखंडी, लाकडाच्या दांड्याने ठेचून रक्तबंबाळ केले, मस्तकावर घाव घातला, गुडघे फोडले. मरणासन्न अवस्थेतील देहावर लघवी करून मारेकरी निघून गेले. शेकडो बघे होते पण कोणीही मदतीला आले नाही. आकाशला अगदी तालिबान्यांप्रमाणे भर रस्त्यावर ठेचून मारण्यात आले. त्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. अडीच मिनिटांच्या या व्हिडिओतील प्रत्येक क्षण अंगावर शहारा आणतो, थरकाप उडवून टाकतो. यात मारेकरी हनुमाननगरात जणू त्यांचीच अनिर्बंध सत्ता आहे, असा मस्तवालपणे हल्ला चढवत, शिवीगाळ करताना दिसतात. प्रश्न पडतो हे हल्लेखोर कोणामुळे एवढे माजले? पोलिसांचा धाक नसल्यामुळे की पोलिसांच्या संरक्षणामुळे अथवा औरंगाबादकर शांत, थंड असल्याने?

बातम्या आणखी आहेत...