आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा दिवसात चौथा खून:नारेगावात पैशांच्यावादातून रिक्षामालकाने चालकाला भोसकले; आधी अपघाताचा बनाव; शवविच्छेदनात खून केल्याचे उघड

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांकडून 3 जणांना अटक

भाडेतत्त्वावर घेतलेली रिक्षा बंद पडल्यानंतर त्यातून झालेल्या वादातून रिक्षामालकाने पैशाच्या वादातून रिक्षा चालवणाऱ्याचा चाकू भाेसकून खून केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री नारेगाव भागात घडली. शेख वसीम शेख फरीद ऊर्फ शाहरुख (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी रविवारी दुपारपर्यंत रिक्षामालकासह तिघांना अटक केली. मागील दहा दिवसांमध्ये शहर व परिसरात झालेला हा चौथा खून आहे. यापूर्वी एमआयडीसी वाळूज, जाधववाडी, मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात तीन खून झाले आहेत. शुक्रवारी रात्री खून प्रकरणातील एका आराेपीची हत्या झाल्यानंतर २४ तासांतच आणखी एक घटना घडली. गँगवॉर, नशेखोरांचे प्रमाण वाढल्याने असे प्रकार वाढल्याचे समाेर येत आहे.

नारेगावमध्ये कुटुंबासह राहणारा वसीम रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. काही दिवसांपासून त्याने नारेगावमधीलच असिफ यांच्या मालकीची रिक्षा भाडेतत्त्वावर चालवायला घेतली होती. २९ मे रोजी तो प्रवाशांना घेऊन शेंद्रा येथे गेला होता. तेथे मात्र रिक्षा खराब झाली. त्याने हा प्रकार रिक्षामालक आसिफला फाेन करून सांगितला. तेव्हा आसिफने त्याला नारेगाव परिसरात परत बोलावून घेतले. वसीम रिक्षा घेऊन नारेगावमध्ये गेला. दर्गावली मशिदीजवळ आसिफची वाट पाहत उभा राहिला. साधारण मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास आसिफ त्याच्या अन्य दोन मित्रांसह तेथे गेला. वसीमने त्याच्याकडे रिक्षा खराब असल्याची तक्रार केली. या वेळी पैशांच्या कारणावरून दाेघांत वाद झाला.

रिक्षामालक आसिफने थेट धारधार शस्त्राने वसीमवर चार ते पाच वार केले. यात वसीम गंभीर जखमी झाला. आसिफ व त्याच्या मित्रांनी वसीमवर वार केल्यानंतर पळून जाण्याऐवजी अपघाताचा बनाव रचला. रक्तबंबाळ अवस्थेत वसीमला घेऊन ते घरी गेले व त्याच्या भावाला वसीम अपघातात जखमी झाल्याचे सांगितले. त्यानंतर वसीमच्या भावाने त्याला आधी खासगी व नंतर घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, एमआयडीसी सिडको पोलिसांनी यात आसिफसह अन्य दोघांना संशयावरून ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

असे उलगडले खूनाचे रहस्य
पाेलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी अपघाताचा बनाव केला. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात डॉक्टरांनी मृताच्या अंगावर चार जखमा असून ‘शॉक अँड हेमोरेंज फॉलोइंग स्टॅब वाऊंड ओव्हर अॅबडाॅमेन’ असे कारण दिले. त्यातून हा खून असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत पाेलिसांनी जखमी अवस्थेत वसीमला घरी घेऊन जाणारे रिक्षामालक आसिफ शेख मुसा (२६), शेख जब्बार शेख सत्तार, (२७) व शेख रईस शेख मुसा यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीनंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...