आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 700 जणांची प्रकृती बिघडली होती. पण सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्यामुळे सर्वजण बचावले. या सर्वांवर औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
घाटीत 22 रुग्ण रात्री तीनच्या सुमारास दाखल झाले होते. यामध्ये 21 जणांना उपचार करून सोडून देण्यात आले असून केवळ एक जण उपचार घेत आहे. तर एमजीएम रुग्णालयात 52 जणांवर उपचार करण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेरचा लग्नसोहळा बुधवारी 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलीकडच्यांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी ठेवली होती. मात्र यावेळी लग्नात बनवण्यात आलेल्या स्वयंपाकातून लोकांना विषबाधा झाली आहे.
गोड पदार्थ खाताच त्रास
राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांच्या मुलाचा विवाह 4 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. विवाहात पाहुण्यांसाठी मेजवानी देण्यात आली होती. जेवणानंतर सर्वांनी गोड पदार्थाचे सेवन केले. हा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळेतच पाहुण्यांना उलट्या व मळमळीचा त्रास जाणवू लागला. काही पाहुणे स्वतहून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. याबाबत आम्ही कदीर मौलाना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
उपचारामुळे बरे वाटत आहे-रुग्ण
घाटी मध्ये भरती असलेल्या सय्यद शोकातुल्ला सय्यद नियाम तुल्ला यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले की, जेवण झाल्यानंतर मला अचानक घाम यायला सुरुवात झाली. तसेच मोठ्या प्रमाणात उलट्या देखील झाल्या. त्यानंतर जुलाब व्हायला सुरुवात झाली पोटही खूप दुखत होते. मात्र आता घाटीत मिळालेल्या उपचारामुळे मला बरे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
21 जणांवर उपचार
घाटीच्या मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले की, 22 जण रात्री उपचारासाठी दाखल झाले होते. त्यामध्ये 21 जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले आहे. तर एक रुग्ण भरती असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांना उलटी-जुलाब, पोटदुखी असा त्रास झाला होता. तसेच अचानक मोठी परिस्थिती उद्भवल्यास डॉक्टरांची टीम देखील तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
MGM मध्ये 52 रुग्ण दाखल झाले होते
एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर.राघवन यांनी सांगितले की एमजीएम रुग्णालयात 52 रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 14 जणांना ऍडमिट करण्यात आले होते. सध्या केवळ 7 रुग्ण ऍडमिट असून इतरांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती राघवन यांनी दिली आहे. या रुग्णांना उलटी जुलाब पोटदुखीचा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.