आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:लग्न मोडल्याच्या रागातून नात्यातील मुलाच्या हॉटेलवर मध्यरात्री गोळीबार; पडेगावातील घटनेत दोघांवर गुन्हा, हॉटेलचा कर्मचारी बालंबाल बचावला

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस आयुक्त निखिल गुप्तांसह अधिकाऱ्यांनी हॉटेलची पाहणी केली.

नात्यातील मुलीसोबतचे लग्न मोडल्याचा राग मनात धरून एका तरुणाने मामाच्या हाॅटेलवर गोळीबार करून मुलीशी लग्न न करण्याची धमकी देणारी चिठ्ठी हाॅटेलच्या दारावर लिहून ठेवली. बुधवारी पहाटे तीन वाजता पडेगाव रस्त्यावरील ‘मनीषा इन’ या हाॅटेलमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी मनीष किसन गायकवाड (२३) याच्या तक्रारीवरून विशाल मनोहर गाडीलकर (रा. कोपर्डी, ता. पारनेर) याच्यासह दोघांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल हा मनीषचा नात्याने भाचा लागतो. काही महिन्यांपूर्वीच मनीषचे त्याच्या चुलत मामाच्या मुलीशी लग्न ठरले आहे. तत्पूर्वी याच मुलीशी विशालसोबत लग्न ठरले होते. मात्र, ही मुलगी आणि विशालमध्ये नऊ वर्षांचे अंतर असल्याने लग्न मोडले. त्यानंतर मनीषसोबत या मुलीचे २५ एप्रिल रोजी लग्न ठरले होते. मनीषमुळेच आपले लग्न मोडल्याचे विशालचा राग होता.

सीसीटीव्हीत दिसला : रात्री हॉटेल बंद करून मनीष घरी गेला, तर कर्मचारी शेख मुजफ्फर हा रिसेप्शनजवळ झोपी गेला. पहाटे तीन वाजता फटाके फुटल्यासारखा आवाज झाल्याने मुजफ्फर घाबरून उठला. त्याने हाॅटेलमागेच राहणाऱ्या मनीषला ही बाब सांगितली. मनीष येऊन पाहणी केली असता रिसेप्शनच्या काचेला गोल छिद्र पडलेले दिसले. त्याने सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता बुलेटवर आलेल्या एकाने पिस्तूलमधून दोन गोळ्या झाडल्याचे दिसले. त्याने तत्काळ छावणी पोलिसांना माहिती दिली. बुधवारी सकाळी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्तांसह अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

झोपलेल्या कर्मचाऱ्याच्या पांघरुणाला लागली गोळी
बुलेटवरील एक व्यक्ती रस्त्यावरच उभी होती, तर दुसऱ्या व्यक्तीने गोळीबार केला. यात पहिली गोळी काचेतून आत गेली. आत झोपलेल्या मुझफ्फरच्या पांघरुणाला छिद्र पाडून ती पुढे जाऊन पडल्याचे आढळून आले. त्यामुळे मुझफ्फर बालंबाल वाचला, तर दुसरी गोळी खिडकीला डास आत येऊ नये म्हणून लावलेल्या जाळीला लागली. घटनेनंतर छावणी पोलिसांचे एक पथक रात्री उशिरापर्यंत नगर जिल्ह्यात आरोपींचा शोध घेत होते.

बातम्या आणखी आहेत...