आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:दिवंगत आईच्या आठवणीने व्याकूळ मुलाने २१ व्या वाढदिवशी केला आत्महत्येचा प्रयत्न; मामा, भाऊ जीव लावतात, पण...

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाबा पेट्रोल पंप चौकातील घटना, महिला पोलिसाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

लहान असतानाच वडिलांचे निधन झाले. नंतर आईने सांभाळ केला. मात्र, सहा महिन्यांपूर्वी तिनेही जगाचा निराेप घेतला. या धक्क्यातून सावरत असतानाच गुरुवारी त्याने वयाची एकवीस वर्षे पूर्ण केली. वाढदिवशी आईच्या आठवणीने व्याकूळ झाल्याने ताे घरातून बाहेर पडला अन् बाबा पेट्रोल पंप चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्यावर अात्महत्या करण्यासाठी उभा राहिला. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या वेदांतनगरच्या महिला पोलिस अंमलदाराने त्याला पाहून गाडी थांबवून त्याच्या दिशेने धाव घेतली. त्याचा शर्ट पकडून मागे ओढल्याने तरुणाचा जीव वाचला.

कटकट गेट येथील इरफान (नाव बदलले आहे) सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत अाहे. सुशिक्षित घरात वाढलेल्या इरफान व त्याच्या आईला मामा, चुलत भावांनी मोठा आधार दिला. काही वर्षांपासून त्याच्या आईला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. अशातच सहा महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले. या घटनेचा त्याला माेठा धक्का बसला. नंतर तो मामाकडे राहण्यासाठी गेला. गुरुवारी त्याचा वाढदिवस असल्याने तो आईच्या आठवणीने व्याकूळ झाला. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुचाकी घेऊन तो थेट बाबा चौकातील उड्डाणपुलावर गेला. दुचाकी उभी करून पेट्रोल पंपाच्या दिशेने असलेल्या कठड्यावर उभा राहिला. त्याच दरम्यान वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस नाईक स्वाती बनसाेडे दुचाकीने ठाण्यात जात होत्या. त्यांना कठड्यावर उभा इरफान दिसताच त्यांनी दुचाकी थांबवली व त्याच्याकडे धाव घेत शर्ट पकडून त्याला मागे ओढले व समजूत घालून बाजूला नेले.

मामा, भाऊ जीव लावतात, पण...
बनसोडे यांनी निरीक्षक रामेश्वर रोडगे, नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. नंतर पोलिस मदतीला आले. त्यांनी इरफानला ठाण्यात नेले. आईविषयी बोलत असताना त्याला रडू आवरत नव्हते. मामा, चुलत भाऊ सर्व जीव लावत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, आईचे प्रेम, तिचे जाणे असह्य झालेल्या इरफानला पाहून उपस्थित पोलिसदेखील हळहळले. त्याच्या मामाला ठाण्यात बोलावून इरफानला त्यांच्या स्वाधीन केले.

बातम्या आणखी आहेत...