आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​क्रौर्याची परिसीमा:बँकेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या पाथर्डीच्या अपंग तरुणाचा पहाटे खून; हातच कापून नेला

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रॅव्हल एजंटने खून केल्याचा संशय : मारेकऱ्याने दुचाकीवर बसस्थानकावरून कब्रस्तानात अाणले
  • मनपा मुख्यालयाजवळील कब्रस्तानात नेऊन गळा कापला, पोटात चाकूचे वार

पाथर्डीहून विकास औरंगाबादेत आला हाेता. त्यामुळे स्थानिक व्यक्तीनेच त्याचा खून केला असावा, असा पाेलिसांना संशय हाेता. उपायुक्त खाटमोडे यांनी आराेपीच्या शाेधासाठी चार पथके तयार केली. एक विकासच्या गावाकडे रवाना केले. औरंगाबादचे मध्यवर्ती बसस्थानक व त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची एका पथकाने तपासणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पहाटे पाच वाजेच्या सुमारास विकास बसस्थानकात दिसून आला . त्यानंतर एका कॅमेऱ्यात ताे एका व्यक्तीशी हुज्जत घालत असल्याचे अंधुकपणे दिसत आहे. काही वेळाने त्याच व्यक्तीसाेबत दुचाकीवर विकास गेल्याही दिसले. त्यावरून पाेलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले. तो बसस्थानकावर ट्रॅव्हल्स एजंट म्हणून काम करताे. रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती. त्यानेच खून केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. मात्र, हात त्याने कापून फेकला की कुत्र्यांनी तोडून नेला, हे सिद्ध होऊ शकले नाही.

गरीब परिस्थिती; उसने पैसे घेऊन परीक्षेसाठी आला
विकासचे कुटुंब गरीब आहे. मोठा भाऊ विवाहित असून तीन बहिणींचे लग्न झालेले आहे. विकासने पदवीपर्यंतचे शिक्षण पाथर्डीला सरकारी होस्टेलमध्ये राहून पूर्ण केले. लॉकडाऊन असल्याने सध्या ताे गावीच हाेता. आई आजारी, अंथरुणाला खिळलेली. वडील व भाऊ नेहमीच ऊसतोडणीसाठी घराबाहेर असायचे. त्यामुळे आजारी आईची शुश्रूषा विकासच करायचा. इतर वेळेत ताे मन लावून अभ्यास करायचा. यापूर्वी त्याने नगर व मुंबईला जाऊनही परीक्षा दिल्या हाेत्या. एरवी ताे मित्रांसाेबत जायचा, मात्र औरंगाबादेतील परीक्षेसाठी एकटाच अाला हाेता. तिकिटासाठी त्याने नातलगांकडून पैसे उसने घेतले हाेते. विशेष म्हणजे विकासकडे माेबाइलही नव्हता. काही दिवसांपूर्वी त्याचा मोबाइल खराब झाला होता, पैशांअभावी ताे दुरुस्त करू शकला नव्हता, अशी माहिती त्याच्या गावातील निकटवर्तीयांनी दिली.

पार्थिव गावी नेण्यासाठी पाेलिसांनीच दिले रुग्णवाहिकेचे पैसे
पाेलिसांचा फाेन आल्यानंतर औरंगाबादला तातडीने कसे जायचे, असा प्रश्न विकासच्या भावाला पडला. त्यावर सरपंच गणेश पवार व इतर गावकऱ्यांनी पैसे गोळा करून त्याला गाडी करून दिली. त्याच्यासाेबत इतर काही जणही औरंगाबादला आले. कुटुंबात एकमेव शिकलेला, अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विकासचा मृतदेह पाहून वडील व भाऊ सुन्न झाले. विकासचे कष्ट, जिद्द पाहिलेल्या गावातील तरुणांच्या चेहऱ्यावर राग होता. पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिकेचेदेखील पैसे कुटुंबीयांकडे नव्हते. अखेर पाेलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी स्वत:हून रुग्णवाहिकेचा खर्च करून पार्थिव गावाकडे पाठवले.

एक संशयित ताब्यात; उशिरापर्यंत चाैकशी
रिझर्व्ह बँकेसाठीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा क्राैर्याची परिसीमा गाठत खून करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. विकास देवीचंद चव्हाण (रा. पाथर्डी) असे मृताचे नाव आहे. उजवा हात तुटलेल्या अवस्थेत मृतदेह कब्रस्तानात सापडला. विशेष म्हणजे हा तुटलेला हात पाेलिसांना सापडू शकला नाही. सिटी चाैक पाेलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलेे. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. मात्र खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील अल्हनवाडीतील हरीचा तांडा (ता. पाथर्डी) येथे विकास राहायचा. त्याने विज्ञान शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतले हाेते. पायाने थोडासा अधू असलेल्या विकासचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न हाेते. आर्थिक परिस्थिती बेताचीच हाेती. आजारी आई १० वर्षांपासून पलंगावर झोपून हाेती. कुटुंबाला यातून वर आणण्यासाठी ताे दिवस-रात्र बँकेच्या परीक्षेची तयारी करत होता. शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात अधिकारीपदासाठी परीक्षा हाेती. औरंगाबादच्या चिकलठाण्यातील परीक्षा केंद्रावर त्याचा पेपर हाेता. परीक्षा सकाळी आ​​​​​​​ठ वाजताच असल्यामुळे विकास गुरुवारीच गावातून निघाला. आठ दिवसांपूर्वी ऊसतोडीवरून आलेल्या मोठ्या भावाने त्याला संध्याकाळी सात वाजता पाथर्डीपर्यंत आणून सोडले. त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत ताे एसटी बसने पैठणमार्गे औरंगाबादमध्ये पोहोचला.

शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजता सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांना मनपाच्या मुख्य इमारतीच्या मागील चितखाना कब्रस्तानमध्ये उजवा हात कापलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यावरून उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर यांच्यासह पवार घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या गळ्यावर, पोटात चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने सहा ते सात वार केलेले हाेेते. श्वानाने चपलेवरून कब्रस्तानचा दुसरा कोपरा गाठला. तिथे एक बॅग सापडली. त्यात विकासचे परीक्षेचे ओळखपत्र होते. त्यावरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी पाथर्डी पोलिसांच्या मदतीने विकासच्या गावातील सरपंचाशी संपर्क साधला. त्यानंतर विकासच्या कुटुंबाला घटनेविषयी माहिती देण्यात आली. दुपारी तीन वाजता ते औरंगाबादमध्ये दाखल झाले. ही घटना एेकून विकासच्या सख्ख्या भावाला धक्काच बसला. चुलत भाऊ राजेंद्र चव्हाण याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व गावाकडे रवाना झाले.

बातम्या आणखी आहेत...