आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कोरोना लसीकरणासाठी गावात जाणार पथक:'व्हॅक्सीनेशन ऑन व्हील' उपक्रमातील दोन वाहनांचे सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरणाचाही शुभारंभ

प्रतिनिधी । औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीकरणाचा टक्का घसरलेला आहे, त्यातच आता शासनाने 15 ते 18 वयोगटासाठीही लसीकरण केंद्राची दारे खुली केली आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांना गावागावात जावून लस देण्यासाठी 'व्हॅक्सीनेशन ऑन व्हील' उपक्रम राबविला जात असून, त्यासाठी मिळालेल्या दोन वाहनांचे लोकार्पण सोमवारी (दि.3) पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

15 ते 18 वयोगटातील सुमारे 4 लाख लाभार्थी

जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोनाची लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी सकाळी 9 वाजता पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत या लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. त्यासोबतच 'व्हॅक्सीनेशन ऑन व्हील' या उपक्रमासाठी शासनाकडून जिल्ह्याला दोन वाहने मिळाली असून, या वाहनांचे लोकार्पणही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष मीना शेळके, आमदार प्रशांत बंब, आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील सुमारे 4 लाख लाभार्थी आहेत.

लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या गावांमध्ये लसीकरण

'व्हॅक्सीनेशन ऑन व्हील' या उपक्रमांतर्गत मिळालेल्या दोन वाहनांचे लोकार्पण सोमवारी वाळूज येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ही वाहने पैठण आणि वैजापूर तालुक्यात फिरतील. तालुक्यांमधील लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या गावांमध्ये, तसेच वाडी-वस्ती, तांड्यावर जावून लस देण्यात येईल. या वाहनामध्ये एक डॉक्टर, 2 नर्स आणि 1 समुपदेशक असतात. समाजातील मुख्य प्रवाहात नसलेल्या समाजातील लोकांचेही लसीकरण करण्यात येईल. जिल्ह्यात महिनाभरापूर्वी खुलताबाद तालुक्यात 'व्हॅक्सीनेशन ऑन व्हील' अंतर्गत एक वाहन मिळालेले आहे. पुढील काही दिवसांत आणखी दोन वाहने मिळणार आहेत.- डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी. औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...