आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मानलेल्या बहिणीने सात लाख उकळले; नंतर पोलिस मित्राच्या मदतीने धमकावले तरुणाच्या आत्महत्येचे गूढ उकलले, गुन्हा दाखल

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फाेनवर सर्व सांगितले, नंतर चिठ्ठीतही लिहिले

अभ्यास करत असताना झालेल्या मैत्रीतून त्याने तिला बहीण मानले. विश्वास संपादन केल्यानंतर तिने आई आजारी असल्याचे कारण सांगून त्याच्याकडे सात लाख रुपये मागितले. त्यानेही मुंबईतील अधिकारी मैत्रिणीकडून उसने घेऊन ते दिले. मात्र पैसे परत करण्याची वेळ येताच मानलेल्या बहिणीने पोलिस असलेल्या प्रियकराच्या मदतीने भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी धमकावणे सुरू केले. एमपीएससीची तयारी करत असलेल्या किशोर भटू जाधव या २९ वर्षीय तरुणाने याच तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्या मोठ्या भावाच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री संबंधित तरुणी, तिचा पोलिस प्रियकर कृष्णासह तीन तरुणी व पाच तरुणांवर किशोरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील वाघाडी खुर्द (ता. सिंदखेडा) येथील किशोर सहा वर्षांपासून औरंगाबादेत एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. त्याचे आईवडील गावाकडे राहतात. मोठा भाऊ विकास हा पुण्याला नोकरी करतो, तर लहान भाऊ शिक्षण घेतो. बाबा पेट्राेल पंप चाैकातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणारा किशोर रोज अभ्यासिकेत जात होता. मात्र, मागील काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. २९ सप्टेंबर रोजी महिनाभरापूर्वीच खोलीवर नव्याने राहण्यासाठी आलेल्या दोन मित्रांसोबत त्याने बराच वेळ गप्पा मारल्या. बाहेर जेवण्यासाठी जायची इच्छा असल्याचे बोलून दाखवले. मात्र, ३० सप्टेंबर रोजी सकाळी खोलीच्या गच्चीवर जात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या वेळी पोलिसांना त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. त्याचा मोठा भाऊ विकासने ती चिठ्ठी व २७ सप्टेंबर रोजी त्याने गावाकडील एका भावासोबत झालेल्या कॉलवरून त्याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांविरोधात तक्रार दिली. त्यावरून मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता या प्रकरणात किशाेरची मानलेली बहीण, तिच्या दोन मैत्रिणी, पोलिस असलेला कृष्णा, मित्र ज्ञानेश्वर पाटील, सचिन केकाण, शोएब व आर्यनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक अमोल सोनवणे याप्रकरणी तपास करत आहेत.

व्यवसाय करायचा हाेता : किशोर सहा वर्षांपासून एमपीएससीची तयारी करत हाेता. मात्र, त्याला त्यात यश मिळत नव्हते. २४ सप्टेंबर रोजी त्याचे भाऊ विकाससोबत फाेनवर शेवटचे बोलणे झाले. त्यावर त्याने त्याने नुकतीच सीबीआयची मुलाखत दिल्याचे सांगितले. त्यात यश न मिळाल्यास मुंबईला अधिकारी असलेल्या मैत्रिणीच्या मदतीने तो ऑटो स्पेअर पार्टचा व्यवसाय सुरू करणार हाेता. तिची भेट घालून देण्याचेदेखील तो बाेलला. मात्र, त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी किशाेरने आत्महत्या केल्याचेच विकासला कळाले. त्यानंतर विकास मित्रासोबत थेट गावाकडे रवाना झाला होता.

फाेनवर सर्व सांगितले, नंतर चिठ्ठीतही लिहिले : नात्यातीलच मनोहर जाधव यांना २७ सप्टेंबर रोजी किशारेने फाेन केला होता. तो मनमोकळा बोलला. मानलेली बहीण, तिचा पाेलिस मित्र कृष्णा व इतर आपल्याला खूप त्रास देत आहे. मानलेल्या बहिणीने सात लाख रुपये घेतले, पण आता ती पैसे देत नाही. उलट त्रास देतेय, असे किशोर सांगत होता. तो पोलीसवाला खोटी केस करण्याची धमकी देत आहे, असे तो म्हणाला. तेव्हा मनोहर यांनी त्याला धीर देत, चिंता न करताच अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत धीर दिला. नंतर तो सावरलादेखील होता. मात्र, त्यानंतर टोकाचे पाऊल उचलले.

नावे अर्धवट, सर्व विद्यार्थी
किशारेने आत्महत्येपूर्वी कागदाच्या दोन्ही बाजूने मजकूर लिहून चिठ्ठी पँटच्या खिशात ठेवली. मात्र, त्याने पैसे दिल्याचा तपशील दिला नव्हता. त्यामुळे हे पैसे कसे दिले याचा पाेलिस तपास करत आहेत. शिवाय, चिठ्ठीतील अनेकांचे नावे अर्धवट आहेत. या नावात एक पाेलिस व इतर विद्यार्थी असून तेदेखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर सर्व पुरावे गोळा करून सखोल तपासाचे आव्हान आहे.

बातम्या आणखी आहेत...