आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:उद्यापासून 2 दिवसीय 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्घाटन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी सज्ज
  • मास्क नाही तर आत प्रवेश नाही
  • ग्रंथप्रदर्शन, भरगच्च साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या शनिवारी (दि. 25) सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. देगलूर येथील ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहेत.

सन्मित्र कॉलनीतील मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी या संमेलनासाठी सज्ज झाली आहे. मराठवाडाभरातून येणाऱ्या साहित्यिकांच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेश करपे यांनी दिली.

संमेलनस्थळाचे निर्जंतुकीकरण -
या संमेलनात कोरोनासंबंधी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. सर्वांना मास्क लावणे आणि शारीरिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दोन्ही सभागृहे आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सभागृहामध्ये शारीरिक अंतर राखले जाईल अशा प्रकारे आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

असे असतील पहिल्या दिवशीचे कार्यक्रम -
संमेलनाच्या पहिल्या दिवशी उद्या शनिवारी (दि.२५) सकाळी ९.३० वाजता ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन होईल. यानंतर १० वाजता मुख्य उदघाटन सोहळा होईल. राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार असून, यावेळी आमदार सतीश चव्हाण आणि म.सा.प विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव मुळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. दुपारी दोन ते पाच या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व्यासपीठ क्रमांक १ मान्यवर कवी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिकसह विविध विषय व धाटणीतील कविता सादर करतील.

कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान संजीवनी तडेगावकर भूषविणार आहेत. याच सभागृहात सायंकाळी पाच ते सात वाजेदरम्यान प्रख्यात विचारवंत जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली 'प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर आली आहे!' या विषयावर पहिला परिसंवाद होईल. यात जेष्ठ पत्रकार नंदकिशोर पाटील, संजय आवटे, अलका धूपकर, रवींद्र केसकर, वैजीनाथ अनमुलवाड सहभागी होतील.

याचवेळी दुसरे व्यासपीठ डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात सु. ग. चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली 'आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर ' या विषयावर परिसंवादाचे दुसरे पुष्प गुंफले जाईल. यात दीपा श्रीरसागर, राम रौनेकर, रवींद्र बेंबरे, संजय जगताप आणि मोहीब कादरी हे सहभागी होणार आहेत. रात्री सात ते नऊ दरम्यान यशवंतराव चव्हाण नाटयगृहात 'लिव्ह इन रिलेशनशिप' हा नाटयप्रयोग सादर केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...