आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गेल्या लॉकडाऊनमध्ये तुटण्याच्या बेतात असलेली रेशीमगाठ या लॉकडाऊनमध्ये पुन्हा बांधली गेली; वकिलाचे समुपदेशन अन् मूल झाल्याने टळला घटस्फोट

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोंडस बाळाच्या जन्मानंतर दाेन्ही कुटुंबांत झाला समेट

शहरातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा व सूनबाईत लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांत बिनसले. वाद इतका विकोपाला गेला की दाेघांच्या नातेवाइकांनी थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला. मुलगी दोन महिन्यांची गरोदर असूनही दोन्ही कुटुंबे गर्भपात करण्यावर अडून बसली. मात्र, या प्रकरणात वकिलाचे समुपदेशन कामी अाले. बाळाचा जन्म झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांतील विसंवाद दूर झाला अन् सून दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन सासरी नांदायला आली.

मुलगा पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याचे लग्न नोव्हेंबर २०१९ मध्ये परभणीतील मुलीशी झाले. दाेघांनी पुणे येथे संसार सुरू केला. मात्र, वाद सुरू झाले. मुलगी सरळ माहेरी परभणीला निघून गेली. त्यानंतर ती गरोदर असल्याचे कळले. वाद एवढा विकोपास गेला होता की दोघांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरले. गर्भपात करण्यावरही एकमत झाले. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याचे कुटुंब अॅड. अण्णासाहेब मुळे (शेकटेकर) यांच्याकडे गेले. त्यांनी सुनेचा गर्भपात करू नका. लग्नानंतर वर्षाच्या आत घटस्फोट मिळणे कठीण आहे. किमान वर्षभर वाट पाहा, सर्वकाही ठीक होईल, असा आपुलकीचा सल्ला दिला.

वकिलांची भूमिका महत्त्वाची
अॅड. मुळे म्हणाले, वकिलांनी अशा प्रकरणात फीसचा विचार न करता तडजोड व्हावी, मुला-मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त हाेऊ नये यासाठी पुढाकार घ्यावा. नवीन पिढी संसारात एकमेकांना समजून घेण्यात कमी पडत असल्याचे निरीक्षणही अॅड. मुळे यांनी नाेंदवले.

गोंडस बाळाच्या जन्मानंतर दाेन्ही कुटुंबांत झाला समेट
ऑक्टोबर २०२० मध्ये मुलीने गोंडस मुलाला जन्म दिला. मुलगा झाल्याची वार्ता तिने सासरी कळवून पुन्हा नांदायला येण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर दोन्ही कुटुंबीयांत समेट झाला. सासरच्यांनीही तिला माेठ्या मनाने माफ करत नातवाच्या स्वागतासाठी घर सजवले. एप्रिल २०२१ मध्ये बाळ सहा महिन्यांचे झाले अन् अाईसाेबत ते अापल्या वडिलांच्या घरी अाले.

बातम्या आणखी आहेत...