आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासातील निष्कर्ष:मारहाण नाहीच; पोलिसांशी बोलताना चक्कर येऊन कोसळल्यानंतर सलून मालकाचा मृत्यू; सीसीटीव्हीतून उलगडले सत्य; तणाव निर्माण करणाऱ्यांवर होणार कारवाई

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शस्त्रक्रिया झालेल्या वाहिनीतील रक्तस्राव गोठल्याने गमावले प्राण

पीरबाजारातील कटिंग सलूनचे मालक फिरोज खान कदीर खान (५०, रा. उस्मानपुरा) यांचा मृत्यू पाेलिसांच्या मारहाणीत झाला नसल्याचे गुरुवारी सीसीटीव्ही फुटेजअाधारे केलेल्या तपासात निष्पन्न झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे फिराेज यांना चक्कर आली व त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पाेलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. बुधवारी जमाव संतप्त झाला होता. गैरसमज दूर करून त्यांना शांत करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून सत्य समोर आणायला वेळ लागला. परंतु त्याचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी पाेलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याची अफवा पसरवत जमावाला चिथावणी दिली. अशा समाजकंटक, चिथावणी देणाऱ्यांचा शोध सुरू असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उस्मानपुरा ठाण्याचे संबंधित उपनिरीक्षक व कर्मचारी निर्दोष असल्याचेही गिऱ्हे यांनी सांगितले.

बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाेलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ व कर्मचारी संदिपान धरणे यांना पीरबाजारातील फिरोज यांच्या मालकीचे सलून उघडे दिसले. मनाई असतानाही सलून कसे उघडले, अशी विचारणा या दाेघांनी दुकानातील कर्मचाऱ्यांकडे केली. तसेच मालक फिरोज यांना बोलावण्यास सांगितले. मात्र, त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तरीही पाेलिसांनी बाेलावण्यासाठी अाग्रह केला. फिरोज खान लगेच दुकानाजवळ अाले. सलूनबाहेर उभ्या कर्मचाऱ्यांसाेबत पाेलिस कर्मचारी धरणे बाेलत असताना अचानक फिरोज यांना चक्कर आली व तेथील बंद शटरच्या कुलपावर त्यांचे डाेके अादळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, धरणे व वाघ यांनी मारहाण केल्यामुळेच फिराेज यांचा मृत्यू झाल्याची अावई दुकानातील कर्मचारी व काही स्थानिकांनी उठवली. त्यामुळे काही वेळातच लाेक जमले. संतप्त जमावाने फिराेज यांचा मृतदेह थेट उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर नेऊन ठेवला.

पोलिसांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पाहता पाहता माेठ्या संख्येने लाेक जमा झाले व तणाव निर्माण झाला. पोलिसांविराेधात घोषणाबाजी सुरू झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता व खासदार इम्तियाज जलील यांनी तिथे येऊन लाेकांची समजूत काढली. तसेच संबंधित पाेलिसांची तातडीने बदली करत असल्याचेही जाहीर केले. त्यानंतर जमाव शांत झाला.

शटरच्या कुलपावर अादळल्याने डाेक्याला गंभीर इजा
फिरोज यांना हेड इंज्युरी असल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. परंतु त्यासोबतच बायपास शस्त्रक्रिया झालेल्या रक्तवाहिनीतील रक्तपुरवठा गोठल्याचेदेखील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना चक्कर आली व कोसळले. थेट तेथील शटरच्या कुलपावर कोसळल्याने डोक्याला गंभीर इजा झाल्याचे अविनाश आघाव यांनी सांगितले. गुरुवारी आठ प्रत्यक्षदर्शींचा जबाबदेखील नोंदवला गेल्याचे त्यांनी सांगितले.

पाेलिसांकडून मारहाण झाली नसल्याचे मान्य; पण फिराेजच्या मृत्यूस जबाबदार काेण : शाेकाकुल कुटुंबीयांचा सवाल. सलून व्यावसायिक फिरोज खान यांचा बुधवारी पीरबाजारातील दुकानासमाेर काेसळून मृत्यू झाला अन‌् या कुटुंबीयांचा अाधारच काेसळला. फिराेज खान यांचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित असून काही जण सरकारी विभागात, तर काहींचा व्यवसाय आहे. सुरुवातीला पाेलिसांच्या मारहाणीत फिराेज यांचा मृत्यू झाल्याची चर्चा झाली, मात्र नंतर तसे काहीच झाले नसल्याचा खुलासा पाेलिसांनी केला. ‘कारण काहीही असले तरी अाम्ही मात्र अामच्या घरातील माणूस गमावला. त्याला जबाबदार काेण?’ असा प्रश्न शाेकाकुल कुटुंबीयांनी दिव्य मराठीशी बाेलताना केला.

फिरोज यांचे मोठे भावजी गुलाम मोहंमद कुरेशी व त्यांचे वकील असलेले मेहुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज यांच्या हृदयावर फेब्रुवारी महिन्यात शस्त्रक्रिया करण्याचे नियोजित होते. मात्र, नंतर अडचणी वाढल्याने नाशिकला एका तज्ञ डॉक्टरकडे ती करण्याचे ठरवले. ५ मार्च रोजी कठीण बायपासची शस्त्रक्रिया पार पडली. कधीही आजारी न पडलेल्या फिरोज यांच्यावर अचानक आजारी पडल्याने दु:खाचा डोंगर कोसळला होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर १० मार्च रोजी त्यांना सुटी मिळाली. २५ मार्च रोजी त्यांना नाशिक येथे पुन्हा तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी खूप काळजी घेण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आम्ही त्यांना घराबाहेर निघूच देत नव्हतो.

सलूनमधील कर्मचाऱ्यांनादेखील तशा सूचना केल्या होत्या. त्यामुळेच बुधवारी सलूनच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना मालक फिरोज आजारी आहेत, त्यांना बोलावू शकत नसल्याचे सांगितले. मात्र, तरीही पाेलिसांनी बाेलावण्याचा हट्ट केला. पोलिस आल्याने आधीच धास्ती घेतलेले फिरोज तत्काळ घराच्या पायऱ्या उतरून दुकानात गेले. तेथील पायऱ्याही चढल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कर्मचारी काय बोलतात हे तर कळत नाही, परंतु त्याच्या काही क्षणातच ते कोसळले व डोक्याला इजा झाली. आता पाेलिसांनी मारले नाही हे मान्य असले तरी दुकानावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी आजारी असल्याचे माहीत असतानादेखील फेराेज यांना तडकाफडकी का बोलावले, त्यांनाच भेटण्याचा पोलिसांचा हट्ट का होता? मारले नाही म्हणून मग त्यांच्या मृत्यूला जबाबदार काेण, याचे उत्तर कोणी देईल का?’ असा प्रश्न त्यांच्या कुटुंबातील शाेकाकूल सदस्यांनी केला आहे.

फार तर दंड करायचा, अाजारी फिराेज यांना बाेलावण्याचा हट्ट कशासाठी?
फिरोज यांच्या मेहुणे वकील अाहेत. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसच मृत्यूस जबाबदार असल्याचा अाराेप केला अाहे. लाॅकडाऊनमुळे फिराेज यांचे वर्षभरापासून आर्थिक नियोजन कोलमडले होते. दुकानातील कर्मचाऱ्यांचा पगार द्यावा लागत होता. व्यवसाय तोट्यात असताना पोटाचा विचार माणूस करेलच ना. मालकाला तत्काळ बोलावण्यासाठी त्यांनी कुठलाही गंभीर गुन्हा केलेला नव्हता. सरकारच्या आदेशात दुकान उघडे असेल तर तत्काळ ५०० रुपयांचा दंड करावा. दुसऱ्यांदा दुकान सील करावे. ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आहेत. परंतु तसे न करता पाेलिसांनी तेथेच थांबून त्यांनी कर्मचाऱ्यांना फिरोज यांना बोलावण्यास सांगितले. जागेवर नोटीस देणे शक्य असताना किंवा दंड घेऊ शकत असताना फिरोज यांनाच भेटण्याची मागणी कशासाठी होती, असा प्रश्न कुटुंबाने केला आहे. अजूनही ते कारवाईच्या मागणीसाठी ठाम असून लढा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वर्षभरापूर्वीच भाऊ गमावला, एकमेव कमावते सदस्य फिराेजही गमावले
सुशिक्षित कुटुंब असलेल्या फिरोज यांच्या कुटुंबात एक भाऊ, एक बहीण, आईवडील हाेते. आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर विदेशात केमिकल कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला असलेल्या मोठा भावाचे २०१७ मध्ये निधन झाले. त्यानंतर फिरोज व त्यांची एक बहीण होते. मात्र, आता फिरोज यांचेदेखील निधन झाल्याने कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाची कल्पनाच करवत नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यांची एक मुलगी दहावीत, तर लहान मुलगी सहावीत शिकते. वडील, मोठ्या भावाच्या निधनानंतर फिरोज कुटुंबातील एकमेव कमावणारे व्यक्ती होते. सोमवारीच त्यांच्या बहिणीचे पती गुलाम मोहंमद कुरेशी यांनी फिरोज यांची भेट घेऊन ‘काळजी करू नकाे, सगळे ठीक होईल’ असे सांगितले होते. गुलाम मोहंमद हे स्वत: अनेक वर्षे विदेशात नोकरीला होते. सध्या त्यांचा उस्मानपुऱ्यात स्वत:चा पुस्तकांचा व्यवसाय आहे.

पाेलिस निर्दाेष; अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
फिराेज यांच्या मृतदेहाचे रात्री साडेदहापर्यंत घाटीत इनकॅमेरा शवविच्छेदन चालले. दुसरीकडे पाेलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळी जाऊन फुटेजची तपासले. सलूनच्या विरुद्ध दिशेला असलेल्या घराबाहेरील सीसीटीव्हीत घटना कैद झाली हाेती. त्यात असे दिसले की, उपनिरीक्षक वाघ सलूनवर कारवाईच्या सूचना देऊन निघून गेले हाेते. कर्मचारी धरणे तेथे फिरोज यांची वाट पाहत उभा आहे. फिरोज अाल्यानंतर त्यांनी पायऱ्या चढल्या व धरणेशी बाेलत असतानाच कोसळले. स्थानिकांनी धाव घेत फिरोज यांना समोरीलच रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर धरणेदेखील तेथून निघून गेले. जवळपास १ मिनिटे ४७ सेकंदांचे व्हिडिओ फुटेज शुक्रवारी माध्यमांनाही मिळाले. त्यात पाेलिसांनी मारहाण केली नसल्याचे स्पष्ट हाेते. त्यामुळे फिराेज यांच्या मृत्यूशी उपनिरीक्षक वाघ व पाेलिस कर्मचारी धरणे यांचा काहीही संबंध नाही, ते निर्दाेष असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहाेचले आहेत.

बातम्या आणखी आहेत...