आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या निराधार बालकांच्या शोधासाठी टास्क फोर्स

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरम्यान जिल्ह्यातील केवळ 463 ग्रामबाल संरक्षण समित्या कार्यरत आहेत.

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या निराधार बालकांचा शोध घेत त्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्स स्थापण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील ग्राम बालसंरक्षण समित्या सक्रिय झाल्या असून त्यांच्यामार्फत आई-वडीलांविना पोरक्या झालेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या विळख्यात अनेक कुटुंब सापडले आहेत. कर्ती माणसे जग सोडून गेल्याने त्या घरातील लहान मुले पोरकी झाली असून त्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय सक्रीय झाले आहे.

या कार्यालयाच्या अखत्यारित जिल्ह्यातील प्रत्येक गावात 463 ग्राम बाल संरक्षण समित्या कार्यरत आहे. समित्यांना आपल्या गाव परिसरात कोरोनामुळे आई वडील मृत्यू पावल्याने निराधार झालेल्या बालकांचा शोध घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान गावपातळीवरील शोध घेऊन निराधार झालेल्या बालकांचा शोध घेत माहिती संकलित करण्यात येणार आहे. नंतर तालुक्यावर कार्यरत असणारे नऊ तालुका बाल संरक्षण समित्या त्यांचा अहवाल जिल्हास्तरावरील समितीस सादर करणार आहेत. जिल्हाभरातील माहिती संकलन झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांना आवश्यक त्या सोयीसुविधा संरक्षण व त्यांचे इतर हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय आराखडा तयार करणार आहे.

दरम्यान जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांकडून दोन्ही पालक मृत झालेल्या मुलांची यादी मागण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे महिला बालविकास कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनामुळे ग्रामबाल संरक्षण समित्या स्थापन करण्याचे काम रखडले आहे. वर्षभरापासून ग्रामसभा घेण्यात आल्या नाहीत. यावर्षी जानेवारीत या सभेचे आयोजन केले होते. परंतु, कोरोनामुळे ते लांबणीवर पडले आहे. दरम्यान जिल्ह्यातील केवळ 463 ग्रामबाल संरक्षण समित्या कार्यरत आहेत.

दरमहा 1 हजार रुपये देण्यात येणार
शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी ही योजना अतिशय चांगली असून याबाबत नातेवाईक व आजूबाजूच्या नागरिकांनी स्वतःहून अशा मुलांची नावे द्यावीत. दरम्यान अशा मुलांचे कोणी नातेवाईक त्यांचा सांभाळ करत असतील तर त्या मुलांना दरमहा 1 हजार रुपये देण्यात येणार आहेत. अगोदर ही मदत 450 रुपये होती. कोरोनामुळे यात वाढ करण्यात आली.
- हर्षा देशमुख, महिला बाल विकास अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...