आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपूर्वी घरगुती वादातून घराबाहेर निघून गेलेले येथील सुखकर्ता अर्बन निधीचे चेअरमन बाळासाहेब सिरसाठ यांचा मृतदेह शनिवारी सकाळी नऊ वाजता शहरातील धनवडे वस्तीजवळील एका शेतातील विहिरीत आढळून आला. मृतदेह गळ्याभोवती कमरेचा पट्टा आवळलेल्या अवस्थेत दिसून आला असून डोक्यालाही जखमा आहेत. मृतदेह आढळलेल्या विहिरीत केवळ गुडघाभर पाणी दिसून आले. सिरसाठ यांना चांगले पोहता येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुटुंबीयांनी हा प्रकारच घातपाताचा असावा, असा संशय व्यक्त करत शवविच्छेदनाची मागणी केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन तो अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात पोलिसांनाही हा प्रकार खुनाचा असावा असा संशय आहे. आष्टी शहरातील सुखकर्ता अर्बन निधीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कुंडलिक सिरसाठ (४५) हे ८ एप्रिल २०२१ रोजी रात्री घरी गेल्यानंतर रात्री दहा वाजता घरगुती वाद झाल्याने घरातून निघून गेले. परंतु रात्री अकराच्या सुमारास त्यांचा फोन आल्याने कुटुंबातील लोकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. परंतु मागील दोन दिवसांपासून त्यांचा फोन बंद होता. धास्तावलेल्या कुटुंबातील लोकांनी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवारातील व्यक्तींना फोन करून तुमच्याकडे बाळासाहेब आलेत का, याची विचारणा केली. परंतु आमच्याकडे आले होते असे उत्तर कोणीच दिले नसल्याने कुटुंबातील लोकांना आणखी चिंता वाटू लागली. दरम्यान, शनिवार, १० एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता आष्टी शहरातील धनवडे वस्ती परिसरातील चव्हाण यांच्या शेतातील विहिरीचे काम करण्यासाठी काही बांधकाम मिस्त्री विहिरीकडे गेले.
यातील धोंडे नावाचा मिस्त्री शेजारील विहीर पाहण्यासाठी गेला असता त्याला विहिरीत एक मृृृतदेह आढळून आला. तेव्हा धोंडे यांनी मुर्शदपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर धोंडे यांना फोन करून विहिरीत मृतदेह असल्याची माहिती दिली. सागर धोंडे यांनी तातडीने ही माहिती आष्टी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटी क्रेनच्या मदतीने बाळासाहेब सिरसाठ यांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला.
मृतदेहाच्या गळ्याला बेल्टचा फास, डोक्याला मार
बाळासाहेब कुंडलिक सिरसाठ यांचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या गळ्याला कमरेचा पट्टा आवळलेल्या अवस्थेत होता. त्याचबरोबर त्यांच्या डोक्यालाही मार लागल्याचे दिसून आले. सिरसाठ यांनी जर आत्महत्या केली असेल तर गळफास घेऊन ते विहिरीत का आणि कशामुळे उडी घेतली, असे अनेक प्रश्न मृतदेह सापडल्यानंतर निर्माण झाले असून सिरसाठ यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी आष्टी पोलिसांकडे विनंती करून सिरसाठ यांचा मृतदेह आहे त्या स्थितीत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्याची विनंती केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.
माझा बाळू असे कधीच करणार नाही
माझ्या बाळूचे काेणाबराेबरच वाद नव्हते. तो अशी टोकाची भूमिका कधीच घेणार नाही. अडचणीत आलेल्या लोकांना तो नेहमीच मदत करत होता. आता त्याला असे कोणी कसे काय करील, असे सांगत त्यांच्या आईने टाहो फोडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल
बाळासाहेब सिरसाठ यांना चांगले पोहता येत होते. ज्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला त्या विहिरीत केवळ गुडघाभर पाणी आढळून आले असून त्यामुळे घटना हत्येची वाटते. त्या दृष्टीने शंका निर्माण होत आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. -भारत मोरे, सहायक पोलिस निरीक्षक, आष्टी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.