आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Number One In Food Processing Industry; Approval For 107 Maize Processing Industries, With At Least Four Jobs Per Project Per Industry | Marathi News

मंडे पॉजिटिव्ह:अन्न प्रक्रिया उद्योगांत औरंगाबाद नंबर वन; मका प्रक्रियेच्या 107 उद्योगांना मंजुरी, उद्योगातून प्रति प्रकल्प किमान चौघांना काम मिळू शकेल

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशभरात सर्वाधिक १०७ लघु उद्योगांचे प्रस्ताव मंजूर होण्याचा मान औरंगाबाद जिल्ह्याला मिळाला आहे. या योजनेत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अशी अट आहे. त्यानुसार औरंगाबादेतील मका प्रक्रिया उद्योगांचे सर्व प्रस्ताव मंजूर झाले आहेत. या उद्योगांना बँकेकडून कर्ज, प्रकल्पाच्या ३५ टक्के अथवा जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान मिळणार आहे. या छोट्या उद्योगातून प्रति प्रकल्प किमान चोघांना काम मिळू शकेल. तसेच शेतकऱ्यांच्या मका पिकालाही चांगला भाव मिळेल. जिल्ह्यात यापूर्वी सुरू असलेल्या प्रक्रिया उद्योगांनाही या योजनेतून आर्थिक मदत मिळणार आहे.

केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत या याेजनेतून सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, इन्क्युबेशन सेंटर, पायाभूत सुविधा, ब्रँडिंग, विपणन, क्षमता बांधणी, संशोधनासाठी प्रशिक्षण आदींसाठी प्रस्ताव मागवले होते. त्यात औरंगाबादच्या सर्वाधिक १०७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली. यात महिलांचेही प्रस्ताव आहेत.

औरंगाबादचा मका, जालन्याची मोसंबी
महाराष्ट्रातील मका हब म्हणून आरंगाबादची ओळख आहे. तिन्ही हंगामांत हे पीक घेतले जाते. खरिपात जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर १५ लाख क्विंटल मका पिकवला जातो. त्यामुळे या जिल्ह्यात मका प्रक्रियेला महत्त्व दिले गेले आहे. तर जालन्याची मोसंबी, बीडला सीताफळ, हिंगोलीला हळद, परभणी ऊस, लातूर टोमॅटो, नांदेड मसाले, असे एक जिल्हा एक उत्पादनावर प्रक्रियेसाठी उद्योगांची निवड करण्यात आली, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले. मका प्रक्रियेतून पशुखाद्य, कोंबडी खाद्य, पोहे, पीठ, फेक्सवेल आदी उत्पादो करता येऊ शकतात. तसेच सोलारवर भाजीपाला वाळवणे, मसाले, हळद, अद्रक, कांदा आदी प्रक्रिया उद्योगांनाही चालना मिळणार आहे, असे ते म्हणाले.

देशभरातून सर्वाधिक प्रस्तावांना मंजुरीचा मान; केंद्राकडून १० लाखांपर्यंतचे अनुदान, बँकांकडून कर्ज मिळणार
सांगली दुसऱ्या, पुणे तिसऱ्या स्थानावर

राज्यात १०७ प्रस्ताव असलेले औरंगाबाद प्रथम, सांगली (७३) द्वितीय व पुणे जिल्हा (३६) तृतीय क्रमांकावर {मराठवाड्यातील जालना व बीड ३, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबादेतून १५ तर कोल्हापूर २९, सातारा २७ प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे.

योजनेचा फायदा काय?
सध्या कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक, स्वयंसाहाय्यता गट, सहकारी उत्पादक यांची पतमर्यादा वाढेल.
उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडता येईल.
देशात कार्यरत २ लाख उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी मदत होणार.
सामाईक प्रक्रिया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन, उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळणार.
या क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण, विस्तारीकरण, आधुनिकीकरण, तांत्रिक साहाय्याचा अधिकाधिक लाभ मिळणार.

शेतमालाला मिळेल योग्य दाम
शेतकरी नैसर्गिक संकटाशी दोन हात करून शेती पिकवतात. मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती काहीच उत्पन्न उरत नाही. त्यामुळे पीक कर्ज, उसनवारीची परतफेड करणे शक्य होत नाही. आर्थिक संकटामुळे आत्महत्या वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवण्याबरोबरच प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. - राजेश इंगळे, उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी, वेरूळ.

बातम्या आणखी आहेत...