आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खड्डेबाद की औरंगाबाद'?:झाडी, डोंगर, हॉटेल पाहून झालं असेल, तर साहेब आता इथले खड्डेही पाहा!

प्राची पाटील| औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक शहर, पर्यटननगरी म्हणून आपली एक वेगळी ओळख जपलेले शहर म्हणजे औरंगाबाद. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये 'खड्डे नगरी' म्हणूनही शहर कुप्रसिद्धीच्या गर्तेत लोटले गेले आहे. स्मार्ट होण्याच्या नादात रस्ते, पाणी, स्वच्छता या मुदद्यांना मनपाने सोयीस्करपणे बगल दिली आहे. बीडबायपास, गजानन मंदिर, उल्का नगरी, जवाहर कॉलनी, रोशनगेट, बुढीलेन, लोटाकारंजा यांसह अनेक रस्ते अजूनही नवजीवन मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर झाडी, डोंगर, हॉटेल पाहून झालं असेल तर साहेब आता इथले खड्डेही पाहा, असा टोला औरंगाबादकरांनी येथील राजकारण्यांना लगावला आहे. 'दिव्य मराठी'ने सामान्यांच्या भावना जाणून घेतल्या.

कुठल्याही शहराचा विकास हा तेथील रस्त्यांवरुनच समजतो. तत्कालीन ठाकरे सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षात शहरातील रस्त्यांसाठी 152 कोटींची निधी दिला. यात महापालिकेच्या वाट्याला आलेल्या अनेक रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र अवघ्या 1 वर्षातच उखडलेले रस्ते, पसरलेली खडी, आणि भगदाडासारखे पडलेले खड्डे दिसून येत आहेत. अजूनही शहरातील कित्येक रस्ते गेली अनेक वर्षे डांबर पाणी न लागल्याने उखडलेली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात हे रस्ते मनपाची पोलखोल करतात. या रस्त्यांबाबत नागरिकांची एकच ओरड असते.

झाडी, डोंगर पाहून झालं असेल तर खड्डे पाहा

नरकातून आल्यासारख वाटतय. जीव मुठीत धरुन बीडबायपासवर आम्ही प्रवास करत असतो. गद्दार संजय शिरसाट यांचा हा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना आम्हाला एकच सांगायचे आहे की, जर तुमचे गुवाहाटी, दिल्ली फिरुन झाले असेल तर आमच्या मतदारसंघात या. येथील अवस्था पाहा. संजय शिरसाट यांना इकडे यायला सांगा. या रस्त्यांवरुन जातांना मनात एकच विचार येतो, आम्ही घरी पोहोचू की थेट वरी पोहोचू. आम्ही कर भरतो. जीएसटी भरतो. राजकारण बाजूला ठेवा आणि आमच्या प्रश्नांकडेही लक्ष द्या. अशी संतप्त प्रतिक्रिया गोविंद मगर, मयुर सोनवणे यांनी दिली.

जीव गेल्यास जबाबदारी कोणाची?

टेम्पो ड्रायव्हर बागो नाजीमुद्दीन यांनी देखील प्रशासनावर रोष व्यक्त केला. ते म्हणाले, बीडबायपास भागातील सर्वच रस्त्यांवरुन जातांना जीवघेणे अनुभव येतात. या रस्त्याचे काम केलेल्या अथवा करणाऱ्या कंत्राटदाराला मी विनंती करु इच्छितो की, या रस्त्याची दुरुस्ती करा. येथून जातांना आम्हाला खूप त्रास होत आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरुन जाणारे रुग्ण, गरोदर महिला यांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होतो. जर या खड्डयांमुळे कोणाचा जीव गेला तर याची जबाबदारी प्रशासन घेईल का. खड्डयांमुळे मृत्यू होऊ नये असे वाटत असेल तर आतातरी जागे व्हा.

नेत्यांना खड्डे दिसत नाही का?

या खड्ड्यामुळे औरंगाबादकरांना खूप त्रास होत आहे. मणक्याचे, पाठीचे आजार जडत आहेत. अपघातांचेही प्रमाणही वाढले आहे. दुरुस्तीच्या नावावर प्रशासन मुरुम टाकते. पाऊस आला की हा मुरुम पुन्हा वाहून जातो. खड्डे पुन्हा उघडे पडतात. रस्ते बनतात, खड्डे होतात. ही नियमित चालणारी कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. गेल्या 5-6 वर्षांमध्ये जवाहर कॉलनीतील या रस्त्याचे तीन ते चार वेळा काम झालेय. आमचे लोकप्रतिनिधी या भागातून स्वतः फिरतात त्यांना हे खड्डे दिसत नाही का? खड्डे लहान तर नाहीत. असा सवाल बालाप्रसाद पंडित यांनी उपस्थित केला.

फायदा नाही

नेहमीची कधीही न संपणारी ही समस्या आहे. त्यामुळे आता या रस्त्यांकडे आणि येथील खड्डयांकडे आम्ही दुर्लक्ष करणेच पसंद करत असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया पायी जाणाऱ्या महिलेने दिली. प्रशासन काही करत नाही. तक्रारी करुन काहीही फायदा होत नाही, असेही त्या म्हणाल्या.

अर्धवट कामाचे हे परिणाम

रोपळेकर चौक ते जवाहर कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची पार चाळणी झाली आहे. छोटेमोठे असे संपूर्ण रस्त्यावर खड्डे पसरलेले आहेत. याच रस्त्यावर फळे विकणाऱ्या मंदा जाधव म्हणाल्या, लोकं येता-जाता येथे पडतात. खड्डयात साचलेले पावसाचे पाणी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे आमच्या अंगावरही उडते. तेथेच उभ्या असलेल्या इतरही महिला या चर्चेत सहभागी झाल्या. वैशाली जमधडे म्हणाल्या, सारखे अपघात होतात. अर्धवट कामाचे हे परिणाम आहेत. लोकप्रतिनिधींकडून कुठल्याही अपेक्षा राहिलेल्या नाही. मनपा प्रशासनाने तरी काही काम करावे एवढीच अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

निदान खड्डे तरी बुजवा

गजानन महाराज मंदिर रोडची अवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून बिकट झाली आहे. मंदिरात येणारे भाविकांची येथे गर्दी असते. या रस्त्यावर हेडगेवार रुग्णालय आहे. दर 1 तासाला याठिकाणी रुग्णवाहिका येत असतात. मात्र सामान्य नागरिकांशी सोयरसुतक नसलेल्या प्रशासनाला या गोष्टीशी काही एक देणेघेणे नाही. या रसत्यावरुन नेहमीच रिक्षा चालवणारे कल्याण गायकवाड म्हणाले, या रस्त्यांमुळे रुग्णांना खरोखर त्रास होतो. डांबरीकरण नाही केले तरी निदान खड्डे तरी बुजवा. मी गेल्या 16 वर्षांपासून शहरात रिक्षा चालवतो. मात्र आता जेवढे खड्डे पाहायला मिळतात तेवढे याआधी नव्हते. मनपाने निदान खड्डे बुजवावे. लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो पण नंतर ते कसे निघतील याबाबत तेव्हा कळत नाहीना अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

नेते धर्मवाद अन् जातीवादात गुंग

सिताराम डोरवे म्हणाले, या खड्डयांमुळे रिक्षासोबत आमचेही मेन्टेनन्स वाढत आहे. आमची चांगलीच वाट लागते या खड्डयांमुळे. आर्थिक खर्च वाढलाय. नेत्यांना याच्याशी काही देणेघेणे नाही. ते आज धर्मवाद अन् जातीवादात गुंग आहे. खासदारापासून ते आमदारापर्यंत, आमदारापासून नगरसेवकांपर्यंत प्रत्येक जण या खड्डयांशी बांधिल आहे. इथे पोट भरणे अवघड झालेले असतांना खड्डयांच्या तक्रारी कोण करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तसेच गाड्यांचे अॅव्हरेज मोठ्या प्रमाणात वाढले असून संध्याकाळी घरी गेल्यावर मुलांकडून कंबर दाबून घ्यावी लागते. तर झोप लागते. नाहीतर खड्डयांमुळे जगणे अवघड झालेय. मनपातले रस्ते बनवणारे इंजीनियर पैसे देऊन तर पास झालेला नाही ना असा मिश्किल सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्कु़टर बंद पडते

मार्केटिंगसाठी नेहमीच फिरणारे विजय शर्मा म्हणाले, पेट्रोलचे भाव गगणाला भिडलेत. आणि त्यातच हे खड्डे म्हणजे गाड्यांच्या अवस्थेतबद्दल न बोललेले बरे. स्कुटरचे मेन्टेनन्स तर मोठ्या प्रमाणावर वाढलेत. या गाड्या खड्डयांमुळे बंद पडतात. आणि लवकर सुरु होत नाही.

ठिगळ लावणार किती दिवस?

महानगरपालिक दरवर्षी पावसाळ्यात ठरलेल्या त्याच त्या उपाययोजना करते. गेल्या वर्षी मनपाने पॅचवर्क करण्यात आले होते. झोन 4 आणि झोन 9 मधील पॅचवर्कच्या कामासाठी सुमारे 57 लाख रुपयांच्या अल्पमुदतीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे पॅचवर्कच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी झाली. यावर्षीही काही रस्त्यांवर मलमपट्टी करण्यात आली. मात्र दोन ते तीन पावसांमध्येच ही मलमपट्टी वाहून गेली आणि महानगरपालिकेचा खरा चेहरा पुन्हा एकदा नागरिकांच्या समोर आला. या रस्त्यांना ठिगळ लावणार किती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सिडको सिग्नलवर मोठमोठे खड्डे

शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाले असून अपघातांचे हे महास्पॉट ठरत आहे. जालना रोडवरून सिडको बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या 1 वर्षापासून तयार झालेल्या दोन खड्डयांमुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना हे महाकाय खड्डे चुकवून प्रवास करावा लागत आहे. शहरातील इतर भागात जसे गजानन महाराज मंदीर रोड ते त्रिमूर्ती चौक, उल्का नगरी या भागांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यांची अक्षरक्षः चाळणी झालेली आहे.

जुन्या शहरातही खड्ड्यांचे साम्राज्य

जुन्या शहरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे झाले आहेत. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. आणि येथून चालणे देखील अवघड होऊन बसते. मात्र मनपा प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे. या रस्त्यांना नव्याने बांधणे गरजेचे झाले आहे.अतिशय वर्दळीच्या रस्त्यांवर मोठमोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. खराब रस्त्यांमुळे वाहतूकीस ब्रेक लागतोच. मात्र त्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

आता स्मार्ट सिटी करणार रस्त्यांची कामे

स्मार्ट सिटीच्या वतीने 317 कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. गुणवत्तापूर्ण कामे होण्यासाठी त्रयस्थ संस्था म्हणून मुंबई आयआयटी काम पहात आहे. पहिल्या टप्प्यात दोन रस्त्यांच्या कामांना परवानगी दिल्यानंतर आता 21 रस्त्यांच्या डिझाईनला आयआयटीने ' ग्रीन ' सिग्नल दिला आहे. यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सात या प्रमाणे 21 सिमेंट रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार आहे. सरस्वती भुवन महाविद्यालय आणि भाग्यनगर येथील रस्त्यांची तपासणी केल्यानंतर आयआयटी मुंबईने पुन्हा 21 रस्त्यांच्या कामांना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार शहरातील विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी सात रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचे स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान यांनी सांगितले.

डांबर प्लांट थंड बसत्यात

पॅचवर्कमधून होणारी आर्थिक उलाढाल म्हणजे मनपाचे आर्थिक नुकसानच आहे हे लक्षात घेऊन 6 वर्षांपूर्वी तत्कालीन मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपानेच स्वतः चा डांबर प्लांट उभारावा पॅचवर्कची कामे करावी, असा प्रस्ताव मांडला. सर्वसाधारण सभेने तो मंजूर देखील केला त्यानंतर त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली. पण पुढे त्यावर काहीच कारवाई झाली नाही.प्लांटची कल्पना अव्यवहार्य आहे. वेगळे युनिट करावे लागेल, स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागेल. यंत्रसामग्री, जागा, त्यासाठी विविध परवानग्या, वाहने, मनुष्यबळ असे युनिटच करावे लागेल. मनपाकडे सध्या तेवढे मनुष्यबळ नाही. अशी कारणे देत यास त्यावेळी विरोध झाला होता. जर हा प्लांट त्याचवेळी उभारला असता तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असली असती असे शहरातील तज्ज्ञ मंडळींचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...