आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री गडकरींचे आदेश:औरंगाबाद-पैठण महामार्ग चौपदरीच, पण 45 ऐवजी 30 मीटर होणार रुंद, बायपासही रद्द

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद ते पैठण या रस्त्याचे आता ४५ ऐवजी ३० मीटर जागेतच चौपदरीकरण करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी एनएचएआयला दिले आहेत. त्यामुळे आता नव्याने भूसंपादन करण्याची गरज राहणार नाही. ज्या ठिकाणी रहदारी अधिक आहे, तिथे गरजेनुसार भूसंपादन करून रस्ता रुंद करा, अशा सूचनाही गडकरींनी दिल्या. दरम्यान, आधीच्या नियोजनामध्ये रुंदीकरणाबरोबरच गेवराई तांडा, बिडकीन आणि ढोरकीन या तीन गावांना बायपास प्रस्तावित केला होता. आता हे तीनही बायपास रद्द केले.

गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीमध्ये एनएचएआयच्या चेअरमन अलका उपाध्याय, मुख्य सरव्यवस्थापक आशिष असाटी व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पैठण रोडची सध्याची संपादित जागा ३० मीटर एवढी रुंद आहे. हा रस्ता एनएचएआयकडे हस्तांतरित झाल्यानंतर तो ३० वरून ४५ मीटर म्हणजे अधिकची १५ मीटर जमीन संपादित करून चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाला होता. भूसंपादनासाठी ८०० कोटी रुपये खर्च येईल, असेही एनएचएआयने सांगितले होते. भूसंपादन आणि चारपदरी डांबरीकरण, तीन उड्डाणपूल, तीन ठिकाणी बायपास असा एकूण १६०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प होता. २४ एप्रिल रोजी नितीन गडकरी यांनी त्याचे भूमिपूजनही केले होते. मात्र, रुंदीकरणासह चौपदरीकरणाचे भूमिपूजन झाल्यानंतर एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी हे काम रद्द करून केवळ दोनपदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. ६ जून रोजी दिल्ली मुख्यालयातून एनएचएआयच्या औरंगाबाद कार्यालयाला तसे पत्र पाठवून औरंगाबाद ते पैठण हा रस्ता दोनपदरीच करा, अशा सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, औरंगाबाद, पैठणमधील अनेक नागरिकांनी विविध मार्गांनी गडकरींशी संपर्क साधत हा रस्ता चौपदरी करण्याची मागणी लावून धरली. तसेच भूमिपूजनानंतरही चौपदरीकरण रद्द केल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. त्यामुळे गडकरी यांनी आता आहे तेवढ्याच जागेत या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जळगाव रोडच्या धर्तीवर होणार चौपदरीकरण
औरंगाबाद ते जळगाव रस्त्याचे चौपदरीकरण हे ३० मीटरमध्येच सुरू आहे. या रस्त्यासाठी नव्याने भूसंपादन केलेले नाही. याच धर्तीवर आता पैठण रस्त्याचे चौपदरीकरण होईल. सूत्रांच्या माहितीनुसार एका बाजूचे दोन पदर हे ७ मीटर एवढ्या जागेत तयार होता. दोन्ही बाजू मिळून प्रत्यक्ष डांबरीकरणासाठी १४ मीटर जागा लागेल. उर्वरित जागेत दुभाजक, शोल्डर असेल. पाणीपुरवठा योजनेतील पाइप टाकण्यासाठी ६ मीटर जागा सोडावी लागणार आहे.

निविदेसाठी ६ महिने प्रतीक्षा : पैठण रस्त्याचा डीपीआर बनवणाऱ्या इजीस या कन्सल्टन्सीकडून ३० मीटर जागेतच चौपदरी रस्त्याचे डिझाइन तयार केले जाईल. हे डिझाइन तयार झाल्यानंतर त्याला मंजुरी मिळेल आणि निविदा प्रक्रिया सुरू होईल. प्रत्यक्ष निविदा निघण्यासाठी अजून ६ महिने वाट पाहावी लागेल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना केंद्रीय मंत्री गडकरी.

दिव्य मराठी पाठपुरावा
औरंगाबाद ते पैठण या रस्त्यावर गेवराई तांडा या सर्वात छोट्या गावाला बायपास प्रस्तावित होता. ज्या ठिकाणाहून बायपास प्रस्तावित होता, त्या ठिकाणी बिल्डर, उद्योजक, राजकारणी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या काँट्रॅक्टर मंडळींच्या जमिनी होत्या. या धनदांडग्यांच्या जमिनींना फायदा व्हावा, म्हणून हा बायपास प्रस्तावित केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी स्थानिक अधिकाऱ्यांपासून गडकरींपर्यंत तक्रारीही केल्या होत्या. ‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम ही बाब उघडकीस आणली होती. आता गेवराई तांड्यासह बिडकीन आणि ढोरकीन येथील बायपास रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...