आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुन्नाभाई'ची दादागिरी:धाड पडताच बोगस डॉक्टरने आरडा-ओरड करून गाव केला गोळा, पथकाशी धक्काबुक्की; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पैठण तालुक्यातील घटना

पैठण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोगस डॉक्टरवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर पैठण तालुक्यात हल्ला

बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना पैठण येथील बालानगर येथे घडली आहे. धाड पडताच या बोगस डॉक्टरने आरडाओरडा करत गाव गोळा केला आणि पथकाशी हुज्जत घातली. या प्रकरणी 5 आरोपीविंरुद्ध पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालानगर येथील डॉक्टर अरबिंदो बिस्वास हा बोगस दवाखाना चालवत असल्याची माहिती आरोग्य पथकाला मिळाली. त्यावरून पैठण तालुका आरोग्य अधिकारी भूषण आगाज, वैद्यकीय अधिकारी युसुफ मनियार, वैद्यकीय अधिकारी सुभाष थोरात यांनी बोगस डॉक्टर बिस्वास याच्या दवाखान्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शिक्षण पात्रता आढळली नाही. तसेच अ‌ॅलोपॅथी औषधे, इंजेक्शनेचा साठा व शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे येथे आढळली.

चौकशी करत असताना डॉ. बिस्वास याने आरडाओरड करून गावातील लोक जमा केले. गावातील लोकांनी पथकाला कारवाई करण्यापासून रोखण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी भगवान गोर्डे, शिवाजी गोर्डे यांनी डॉक्टरवर कारवाई करू नका असे म्हणत पथकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर इंजेक्शनचा साठा व शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे घेऊन ते निघून गेले. तसेच त्यांनी या बोगस डॉक्टरला फरार होण्यास मदत केली.

दरम्यान कोरोना काळात आरोपी रवी भुजबळ, आसिफ शेख यांच्यासह गावातील लोकांनी गर्दी केली होती. आरोपी डॉ. अरविंद बिस्वास याने गावातील लोकांचा डॉक्टर आहे असे भासवून फसवणूक केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. युसूफ मनियार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बालानगर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच आरोपीविंरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. पो. नि. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...