आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळात मराठवाडा:औरंगाबाद - पैठण रस्ता 30 मीटरचाच होणार, साईबाबा तीर्थक्षेत्र आराखड्यास मंजुरी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

| गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला औरंगाबाद - पैठण रस्ता ३० मीटरचाच होणार यावर विधिमंडळातही शिक्कामोर्तब झाले. या संदर्भात विक्रम काळे, सतीश चव्हाण, बाळाराम पाटील, कपिल पाटील यांनी असा प्रश्न विचारला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, पैठण ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२ ईचे चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाच्या अखत्यारीत असून प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, औरंगाबाद यांच्यामार्फत प्रगतिपथावर आहे. डीपीआर तयार होत आहे. अतिरिक्त भूसंपादन न करता अस्तित्वातील ३० मीटर जागेतच चौपदरीकरण करण्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तांत्रिक सल्लागारामार्फत तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

चार जिनिंग-प्रेसिंग मालमत्तांचा लिलाव हिंगोली जिल्ह्यातील चार जिनिंग-प्रेसिंग संस्थांच्या मालमत्तांचा लिलाव करून त्या विक्री करण्यात आल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रश्नावरील लेखी उत्तरात म्हटले आहे. सेनगाव येथील सहकारी जिनिंग प्रोसेसिंग कारखान्यासाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या शासकीय जमिनीवरील संस्थेकडील थकबाकीबद्दल हा प्रश्न होता. त्यावर सावे यांनी म्हटले आहे की, परभणी जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलेल्या हिंगोली जिल्ह्यातील ११ सहकारी जिनिंग प्रेस संस्था थकबाकीत आहेत. त्यापैकी कळमनुरीतील एक, हिंगोली तालुक्यातील एका संस्थेचे दोन युनिट, औंढा तालुक्यातील एका संस्थेची मालमत्ता जप्त करून बँकेमार्फत लिलावाद्वारे विक्री करण्यात आली आहे. सेनगावच्या संस्थेकडे शासकीय जमीन लीजवर नाही.

साईबाबा तीर्थक्षेत्र आराखड्यास मंजुरी पाथरी (जि. परभणी) येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा १४९ कोटी रुपयांचा प्रस्ताव परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्यात येत आहे. त्या समितीच्या मान्यतेनंतर मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या शिखर समितीसमोर हा आराखडा मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, असे लेखी उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या संदर्भात बाबाजानी दुर्राणी यांनी प्रश्न विचारला होता. त्यांचे म्हणणे होते की, २०३ कोटींचा हा प्रस्ताव असून त्यात सुधारणा करण्याबाबत मुख्य सचिव तथा अध्यक्ष, उच्चस्तरीय समिती यांनी सूचित केले आहे. गेल्या काही वर्षांपासून या तीर्थक्षेत्राविषयी उलटसुलट चर्चा सुरू असून येथील विकासाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कळंबला अखेर वीजपुरवठा सुरळीत कळंब (जि. उस्मानाबाद) येथे दोन ट्रान्सफाॅर्मर बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे लेखी उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कैलास घाडगे पाटील यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात त्यांनी म्हटले आहे की, कळंब उपकेंद्रामधील येथील दोनपैकी एक ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने दुसऱ्यावर अतिरिक्त भार वाढला. वादळवारे व पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण काहीसे वाढले होते. म्हणून १० मे रोजी नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आला. परंतु त्याची चाचणी असमाधानकारक दुसरा ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...