आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादेतील फ्रान्सिलियन स्कूल ऑफ एक्सलन्स या शाळेने विद्यार्थ्यांचे शुल्क अचानक 40 टक्क्यांनी वाढवले. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आज शाळेत घुसून ठिय्या आंदोलन केले.
पालकांनी तब्बल साडेतीन तास आक्रमक आंदोलन केल्यामुळे शाळेचे व्यवस्थापन नरमले. साडेतीन तासानंतर शाळा व्यवस्थापनाने खुलासा केला की, पालकांना दिलेल्या नवीन दरपत्रकात प्रिंट मिस्टेक झाली आहे. त्यामुळे पालकांनी शांत व्हावे.
पालकांना सुधारित दरपत्रक देण्यात येईल, असे लेखी आश्वासन शाळेने दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले. पालकांचा रोष पाहता पोलिसही घटनास्थळी हजर होते.
पालकांना अचानक कळवला निर्णय
फ्रान्सिलियन स्कूल ऑफ एक्सलन्स या शाळेने आज पालकांची बैठक सकाळी 10 वाजेच्या सुमारास बोलावली होती. बैठकीत शाळेने अचानक 40 टक्के शुल्कवाढ केली, असा निर्णय पालकांना कळवण्यात आला. तसे, दरपत्रकही पालकांना देण्यात आले. अचानक झालेल्या या निर्णयामुळे पालक चांगलेच संतापले.
ही शुल्कवाढ अवाढव्य आहे, असे म्हणत पालकांनी या निर्णयाला विरोध केला. मात्र, शाळा व्यवस्थापन जुमानत नसल्याने पालकांनी शाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केले. 40 टक्के शुल्कवाढीचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली.
प्राचार्य भेटलेच नाही
पालकांनी शाळेच्या प्राचार्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. मात्र, प्राचार्य पालकांसमोर आलेच नाहीत. प्राचार्य एका व्हिसी मिटींगमध्ये असल्याची बतावणी शाळ व्यवस्थापनाने केली. यामुळे पालक आणखी संतापले.
शाळेचे प्राचार्य पालकांना भेटत नाहीत. पालकांना चांगली वागणूक दिली जात नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. तसेच, शाळा व्यवस्थापनाने पालक समितीही आपल्या मर्जीनेच बनवली आहे. या समितीकडून विद्यार्थी व पालकांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाही, असाही आरोप पालकांनी केला. कोणालाही विश्वासात न घेता शाळेने ही मनमानी दरवाढ केली आहे, असा आरोप करत आज सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत संतप्त पालकांनी शाळेतच ठिय्या आंदोलन केले.
साडेतीन तासानंतर खुलासा- ही तर प्रिंट मिस्टेक
पालकांच्या आक्रमकपणामुळे अखेर शाळेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मरिया आणि सिस्टर कांता या पालकांना सामोरे गेल्या. त्यांनी खुलासा केला की, पालकांना जे दरपत्रक देण्यात आले आहे, त्यात प्रिंट मिस्टेक झाली आहे. लवकर सुधारित दरपत्रक दिले जाईल.
मात्र, उपमुख्याध्यापिकांच्या या तोंडी आश्वासनावर पालकांचा विश्वास बसला नाही. त्यांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. अखेर शाळा व्यवस्थापनाने सुधारित दरपत्रक देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले.
पालकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसही आंदोलनस्थळी हजर झाले होते. त्यांनीही पालकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.