आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधांची टंचाई:औरंगाबादच्या प्रश्नांची भिस्त एकाच आमदारावर ; हिवाळी अधिवेशनात मांडणार लोकांच्या अडचणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटी रुग्णालयातील औषधांची टंचाई, भंगारमध्ये टाकण्यात येणारे कोविड काळातील साहित्य, शहरातील विजेच्या खांबांचा प्रश्न, स्मार्ट सिटीच्या सिटी बसेसचे थांबे आणि बहुचर्चित पाणीपुरवठा योजनेचा प्रलंबित प्रस्ताव यासारखे शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पटलावर मांडण्यात आले आहेत. अर्थात, सर्व आमदार सत्ताधारी पक्षांचे असल्याने विरोधी पक्षनेते, एक मंत्री आणि एक तालिका अध्यक्ष असल्याने विधिमंडळात शहराचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी केवळ आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यावर आली आहे. त्यांनी शहर विकासाशी संबंधित तब्बल ३० प्रश्न पाठवले आहेत. आता आशा आहे त्यावर त्यांच्याच सरकारच्या वतीने उत्तर मिळण्याची व शहर विकासाची गती वाढवण्याची.

अधिवेशनात पाठवण्यात आलेल्या शहरातील प्रश्नांमध्ये सर्वाधिक प्रश्न स्मार्ट सिटी योजनेशी संबंधित असून यात स्मार्ट सिटी प्रशासनाने उपलब्ध निधीपेक्षा अडीचशे कोटींची जास्तीची कामे मंजूर केल्याबद्दलची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. { महापालिकेस दरमहा १५ कोटींची तूट कशी? { गॅस पाइपलाइनसाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत कधी करून देणार? { घाटी रुग्णालयातील औषधांची टंचाई कधी संपणार? { वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी जोडण्यासाठी अखंड उड्डाणपुलाच्या प्रस्तावाचे काय झाले? { जुनी जलवाहिनी पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक १९३ कोटींची प्रलंबित योजना कधी कार्यान्वित होणार? { जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमापन विभागात धूळ खात पडलेल्या दीड हजार संचिका कधी मार्गी लागणार? { घरकुलाचा रखडलेला प्रकल्प कधी पूर्ण होणार? { शहागंज भाजी मंडईचा बीओडी प्रकल्प गुंडाळण्यात येत आहे का? { हर्सूल रस्ता रुंदीकरणातील १९ कोटींचा मोबदला कधी मिळणार? { महावितरणला १३ कोटी अदा करूनही रेंगाळलेले डीपी, रस्त्यांवरील विजेच्या खांबांचे प्रश्न कधी सुटणार? { मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नेमलेल्या एजन्सीचा करार कधी रद्द करणार? { मध्यवर्ती बसस्थानकाच्या विकास शुल्कात किती सूट मिळणार? { औरंगपुऱ्यातील कन्या प्रशालेचा भूखंड भूमाफियांच्या घशात घालण्याचे कारस्थान कधी थांबणार? { मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने तत्कालीन सरकारने मंजूर केलेला ७५ कोटींचा निधी कधी मिळणार?

स्मशानभूमी, स्मार्ट सिटी, थम्ब मशीनचा प्रश्न मांडू स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात ९ स्मशानभूमी विकसित करण्याचा मुद्दा, स्मार्ट सिटी योजनेतील आधुनिक बस दुरवस्था, तेथील वाहक व चालकांची टंचाई, इलेक्ट्रिक बसच्या निविदांना दिलेली स्थगिती आणि या योजनेअंतर्गत महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बसवण्यात आलेले निकृष्ट थम्ब मशीन याबद्दलचे प्रश्न मांडण्यात येणार असल्याची माहिती आ. प्रदीप जैस्वाल यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...