आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जटवाड्याचा संपर्क तुटला:हर्सूल तलाव ओव्हरफ्लो, 215 विद्यार्थी ‘एव्हरेस्ट’मधील सीईटी परीक्षेला मुकले

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे हर्सूलसह जटवाडा गावाचा संपर्क तुटला. विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता आले नाही. छाया : मनोज पराती - Divya Marathi
हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे हर्सूलसह जटवाडा गावाचा संपर्क तुटला. विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता आले नाही. छाया : मनोज पराती

शहरात मंगळवारी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असताना अचानक अकरा वाजता पावसाचा जोर वाढला. त्यामुळे हर्सूल तलाव ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूने पर्यटक, विद्यार्थी अडकून पडले हाेते. २८ सप्टेंबर राेजी हाेणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेला अनेक विद्यार्थ्यांना मुकावे लागले.

पावसाने सोमवारी रात्रीपासूनच हजेरी लावली हाेते. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हर्सूल तलाव ओसंडून वाहत होता. जटवाड्याकडून हर्सूल तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. एवढेच नव्हे तलावाच्या जवळील नदी दुधडी भरून वाहत होती. एकीकडे हर्सूल तलावातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचा जोर मोठा असल्याने जटवाडा-हर्सूल रस्ता पूर्णतः बंद झाला हाेता.

एव्हरेस्ट कॉलेज परीक्षा केंद्रावर होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षा सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत होती. सकाळी ३०० विद्यार्थ्यांपैकी २५४ विद्यार्थी परीक्षेला हजर होते, तर ४६ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. दुपारी २ वाजता होणाऱ्या सदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दुपारी दीड वाजता पोहोचणे गरजेचे होते. परंतु, पावसाचा जोर आणि हर्सूल तलावाच्या ओव्हरफ्लोमुळे रस्ता बंद झाला. त्यामुळे केंद्रावर ३०० विद्यार्थ्यांपैकी फक्त १३१ विद्यार्थी हजर होते, तर १६९ विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली. दरम्यान, पावसामुळे अनेकांना परीक्षा देता आली नाही, अशा मुलांची व परिस्थितीची माहिती सीईटी सेलला पाठवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

आम्ही सीईटी सेलला ई-मेल पाठवणार
मी लातूरवरून परीक्षा देण्यासाठी आलो. एमएचटी-सीईटीचा पीसीबीचा पेपर एव्हरेस्ट कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर दुपारी २ वाजता होता. पावसामुळे हर्सूल तलावाचे पाणी रस्त्याने वाहत होते. पाण्याचा जोर वाढल्याने अनेक विद्यार्थी अडकले. त्यामुळे परीक्षासुद्धा देता आली नाही. याबाबत आम्ही सीईटी सेलला ई-मेल करून माहिती पाठवणार आहे.-सूरज पालवे, विद्यार्थी

पुलावरून पाणी वाहत असल्याने शहरासह परजिल्ह्यातून आलेले विद्यार्थी परीक्षेला मुकले.
पुलावरून पाणी वाहत असल्याने शहरासह परजिल्ह्यातून आलेले विद्यार्थी परीक्षेला मुकले.

पाचशेहून अधिक लोक अडकले
पावसामुळे जटवाड्याकडून हर्सूल तलावमार्गे पुढे जाणारे पर्यटक तसेच जटवाड्याकडे येणारे पर्यटक दोन्ही बाजूने अडकले. दोघांमध्ये तलावातील पाण्याचा फ्लो चालू होता. सकाळी ११ वाजेपासून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दुपारी ४ वाजले. या ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक आलेले नव्हते. त्यामुळे अनेकांना ताटकळत बसावे लागले.

बातम्या आणखी आहेत...