आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण:शिंदेंच्या घराजवळील विहिरीत कपडे, शस्त्रांचा दीड तास शोध; पण अपयश

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीड वर्षापासून सुरू असलेले कथासदृश लिखाण हाती; त्यात गेम, काल्पनिक घटनांचा उल्लेख

प्रा. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (५१) यांच्या क्रूर हत्येला तीन दिवस उलटले. तरीही पोलिस सबळ पुराव्यासह आरोपीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. शिंदे यांना त्यांच्या अत्यंत जवळच्या, संपर्कातील व्यक्तीनेच मारून घराच्या आसपास हत्यारे, त्या वेळी घातलेले कपडे फेकले आहेत का, हे शोधण्यासाठी बुधवारी पोलिसांनी मोहीम हाती घेतली. त्यात शिंदेंच्या घराजवळील विहिरीत अग्निशमन दलाचे जवान उतरवण्यात आले. दीड तासानंतर काहीही हाती लागले नाही. शिवाय कचऱ्याने तुंबलेल्या विहिरीत विषारी वायू असल्याचे जाणवल्याने खोलवर जाणे शक्य नव्हते. म्हणून पोलिसांनी माघार घेतली. आता त्यांची भिस्त तांत्रिक तपासातून काही धागेदोरे मिळवण्यावर आहे.

शिंदेंवर पहाटे तीन ते चारच्या दरम्यान हल्ला झाला, असा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मात्र, मारेकऱ्याच्या जवळपास जाता येईल असा ठोस पुरावाही हाती लागलेला नाही. बुधवारी दुपारपर्यंत शिंदे यांच्या अस्थिविसर्जनात त्यांचे कुटुंबीय व इतर व्यग्र होते. दुसरीकडे पोलिसांनी बुधवारी सकाळी नऊ वाजेपासून निकटवर्तीयांव्यतिरिक्त शिंदेंचा मित्रपरिवार, इतर नातेवाईक अशा सुमारे ४० ते ४५ जणांना विश्वासात घेऊन, धीर देत विचारपूस केली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. ११ ऑक्टोबर रोजी चिश्तिया पोलिस चौकीत जाण्यासाठी शिंदे यांच्या मुला-मुलीने सिडको एन-४, गजानन महाराज मंदिर, जालना रोड असा मार्ग निवडला. तेथून ते सरळ रस्त्याने घरी जाण्याऐवजी एपीआय कॉर्नरमार्गे गेले. या सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल.

या संपूर्ण तपासात शिंदेंच्या एका निकटवर्तीयांनी लिहिलेले कथा - कादंबरीसदृश लिखाण पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात गेम, सिनेमाच्या अनुषंगाने तर काही काल्पनिक व दैनंदिन घडामोडींविषयी नोंदी आहेत. चार ते पाच डायऱ्यांमध्ये दीड वर्षापासून सुरू असलेले लिखाण आहे. त्याची तपासणी करण्यात आली असता हत्येविषयी काहीही आढळले नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

७२ तासांनंतरही अपयश
संपूर्ण गुन्हे शाखेसह पोलिस आयुक्तांनी स्थापन केलेले विशेष तपास पथक, इतर विविध ठाण्यांतील महिला अधिकारी याप्रकरणी सोमवारपासून तपास करत आहेत. शिंदेंच्या कुटुंबासह जवळपास ६० ते ७० जणांची विचारपूस झाली. प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. काही ठराविक निकटवर्तीयांवर लक्ष केंद्रित करूनही हाती काहीच लागलेले नाही. आठ प्रमुख दिशांनी तपास होत आहे. मात्र, आता सर्वाधिक भिस्त तांत्रिक दुवे जुळवणे आणि त्यातून पुरावे शोधणे यावरच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गॅसमुळे तपासात अडचण
हल्लेखोराने जवळपासच हत्यारे, कपडे फेकले आहेत का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यासाठी बुधवारी अग्निशमन विभागाच्या मदतीने शिंदेंच्या घराजवळील गवत, खुल्या जागेवर साठलेला कचरा व विहिरीत तपास केला. ५० फूट खोल विहिरीत काही सापडते का, याचा शोध दीड तास घेण्यात आला. विहिरीला जाळी असली तरी त्यात काही टाकता येईल, इतकी जागा उघडी आहे. त्यातून एका जवानाने आत उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यासह कचरा, गॅसदेखील जाणवल्याने खोलात उतरून तपासणी अशक्य ठरली.

पत्नीचा बदलीसाठी प्रयत्न
डॉ. राजन शिंदे यांच्या पत्नी प्रा. डॉ. मनीषा यांनी मुलगी चैतालीला सोबत घेऊन मंगळवारी (१२ ऑक्टोबर) कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेतली. माझी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रातून औरंगाबाद येथील विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात बदली करावी, अशी तोंडी मागणी त्यांनी केली. दीड वर्षापूर्वी लेखी निवेदन दिल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार केला जाईल. मात्र, आस्थापना विभागात चर्चा करून येथे बदली करता येऊ शकते का, जागा उपलब्ध आहे का, हे तपासावे लागेल. सध्या जे घडले आहे त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. सहानुभूतिपूर्वक विचार करण्यात येईल, असे त्यांना सांगितल्याचे कुलगुरू म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभाग विनाअनुदानित आहे तर उस्मानाबाद उपकेंद्रातील विभाग अनुदानित आहे. प्रा. डॉ. मनीषा यांची मूळ नियुक्तीच उपकेंद्रासाठीची आहे. त्यांनी डॉ. विजय पांढरीपांडे कुलगुरू असतानाही बदलीसाठी प्रयत्न केले होते. परंतु, त्यांची मागणी याच मुद्द्यावर नाकारण्यात आली होती. आताही अनुदानित विभागातून विनाअनुदानित विभागात बदली होणे कठीण असल्याचेही विद्यापीठातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...