आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणने 31 जानेवारी 2023 रोजी राज्यभरातील ग्राहकांना 24,750 मेगावॅट इतका आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी वीज पुरवठा केला, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
कोरोनाची साथ येण्यापूर्वीच्या 2019-20 या आर्थिक वर्षात फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वाधिक 21,570 मेगावॅट वीज पुरवठा महावितरणने केला होता. मार्चच्या अखेरीस कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाला आणि आर्थिक व्यवहार ठप्प झाले. परिणामी औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा वीज वापर खूप कमी झाला. पण घरगुती ग्राहकांचा वीजवापर वाढला. त्यावेळी एप्रिल 2020 या महिन्यातील एका दिवसातील सर्वाधिक वीज पुरवठा 16,690 मेगावॅट इतका झाला होता.
त्यानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होऊन लॉकडाऊन मागे घेण्यात आला तसा वीजवापर वाढला. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत मार्च महिन्यात सर्वाधिक वीज पुरवठा 22,554 मेगावॅटवर पोहोचला.
एप्रिल 2022 मध्ये सर्वाधिक वीजपुरवठा
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आर्थिक व्यवहार वाढत गेले आणि राज्यातील वीजवापरही वाढला. 2021-22 या आर्थिक वर्षातील सर्वाधिक वीज पुरवठा मार्च 2022 या महिन्यात 24, 219 मेगावॅट इतका झाला. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात वीजवापर मोठ्या प्रमाणात होत असून एप्रिल 2022 महिन्यात सर्वाधिक वीजपुरवठा 24, 668 मेगावॅट इतका होता.
वीजवापर वाढत गेला
जुलै या पावसाळी महिन्यात सर्वाधिक वीज पुरवठा 19, 157 मेगावॅट इतका होता. ऑगस्टमध्ये हा आकडा वाढला. पुढे त्यात थोडी कपात होऊन सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये सर्वाधिक वीज पुरवठा अनुक्रमे 19, 076 मेगावॅट व 19, 022 मेगावॅट इतका झाला. त्यानंतर राज्यातील वीजवापर आणखी वाढत गेला.
सर्वोच्च वीज उपलब्धीचा विक्रम
डिसेंबर हा थंडीचा महिना असूनही त्या महिन्यातील सर्वाधिक पुरवठा 24, 067 मेगावॅट एवढा होता. जानेवारी महिन्याच्या अखेरीस तर 24, 750 मेगावॅट इतक्या सर्वाधिक वीज पुरवठा करून महावितरणने राज्यातील 2.92 कोटी वीज ग्राहकांना सेवा देऊन यश मिळवले आहे. तसेच सर्वोच्च वीज उपलब्ध करून देण्याचा नवा विक्रमही प्रस्थापित झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.