आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:मिनी घाटीतून 5 रेमडेसिविर इंजेक्शन चोरी; गुन्हा दाखल; नर्सची पोलिस ठाण्यात तक्रार, वरिष्ठांनी हात वर केले

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वीही मिनी घाटीतील घोटाळा समोर आल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी हात वर करत प्रकरणावर बोलणे टाळले होते

कोरोना रुग्णांच्या उपचारात अत्यंत महत्त्वाची असलेली रेमडेसिविर इंजेक्शन्स मिनी घाटीच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने काळ्याबाजारात विकल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. त्यापाठोपाठ मिनी घाटीतूनच पाच इंजेक्शन चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा एका नर्सच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकलठाणा येथील मिनी घाटीत (जिल्हा रुग्णालय) सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण दाखल आहेत. १६ एप्रिल रोजी चतुर्थश्रेणी कर्मचारी इंजेक्शन चोरून काळाबाजार करत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर दहा दिवसांनी त्याच मिनी घाटीतून पुन्हा पाच रेमडेसिविर चोरीला गेले आहेत.

वॉर्डप्रमुखांच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांमार्फत नर्सकडे इंजेक्शन सोपवले जातात. या पद्धतीनुसार शुक्रवारी दुपारी मिनी घाटीतील विभाग सीमध्ये १६ रेमडेसिविर देण्यात आले. विभागप्रमुखाने ते फ्रिजमध्ये ठेवले. शनिवारी सकाळी या विभागाच्या परिचारिकेने रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी फ्रिज उघडले असता तेथे केवळ अकराच इंजेक्शन असल्याचे दिसते. तिने इंजेक्शन कुणाला दिले का याची खातरजमा केली. मात्र शुक्रवारी प्राप्त १६पैकी एकही इंजेक्शन वापरले गेले नसल्याचे त्यांना कळले. त्यामुळे हे पाच इंजेक्शन चोरीला गेल्याचे समोर आले. संबंधित घटना मिनी घाटीच्या वरिष्ठांना कळवण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तक्रार देण्याचे निश्चित करण्यात आले. एका नर्सने एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. उपनिरीक्षक संदीप बागूल या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

आधी नाकारले, आता पुन्हा इंजेक्शन चोरीला
१६ एप्रिल रोजी शहरात रेमडेसिविरचा खुलेआम काळाबाजार होत असल्याचा प्रकार समोर आला होता. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पथकासह या प्रकरणात चार दिवसांमध्ये एकून चार जणांना अटक केली. यात बीड येथील मेडिकल चालक दीपक सुभाष ढाकणे (३३, रा. बांगरी रोड, बीड) याच्यासह मिनी घाटीतील चतुर्थश्रेणी कर्मचारी अनिल ओमप्रकाश बोहते, त्याच्याकडून इंजेक्शन घेणारे शिवाजीनगरमधील मयूरेश्वर मेडिकलचे चालक मंदार अनंत भालेराव व सूतगिरणी चौकातील इंद्रा मेडिकलचा मालक अभिजित नामदेव तौर यांचा समावेश आहे. बोहतेने मिनी घाटीतून इंजेक्शन चोरून काळाबाजार केल्याची वारंवार कबुली दिली. पुंडलिकनगर पोलिसांनी या प्रकरणात दोन वेळेस मिनी घाटी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून विचारणा केली. मात्र मिनी घाटीचे प्रमुख डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी यावर बोलण्याचे टाळले.

यापूर्वीही झाला होता घोटाळा
पोलिसांना पाठवलेल्या उत्तराच्या पत्रातही अपुरी माहिती देण्यात आली. शनिवारी इंजेक्शन चोरीच्या प्रकरणात डॉ. कुलकर्णी यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी तर मला यामधील काहीच माहीत नाही, असे उत्तर दिले. यापूर्वीही मिनी घाटीतील घोटाळा समोर आल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी हात वर करत प्रकरणावर बोलणे टाळले होते, हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...