आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ९७.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल सन २०२० (९२.१० %) च्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांनी जास्त तसेच २०२१ चा अपवाद वगळता आतापर्यंत सर्वाधिक आहे. गतवर्षी विक्रमी ९९.९७ टक्के निकाल लागला होता. मात्र तेव्हा कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण ६३ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, पण ६३ हजार ३३५ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. त्यापैकी ६१ हजार ४४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर १,८९१ मुले अनुत्तीर्ण झाली. नेहमीप्रमाणे यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचेच प्रमाण १.७९ टक्क्यांनी जास्त आहे. ९७.९९ टक्के मुली व ९६.२० टक्के मुले पास झाली आहेत.
बाेर्डाच्या औरंगाबाद विभागांतर्गत पाच जिल्हे येतात. त्यात औरंगाबाद जिल्हा निकालाच्या टक्केवारीत (९७.०१) दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ९७.२० टक्के घेऊन बीडने विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा विचार केल्यास औरंगाबाद तालुका प्रथमस्थानी, तर सोयगाव तालुका सर्वात शेवटच्या स्थानी आहे.
मनपा शाळेची पोरं हुशार; १७ पैकी १० शाळांचा निकाल शंभर टक्के
खासगी शाळांच्या तुलनेत अतिशय कमी सुविधा असतानाही मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावी बाेर्ड परीक्षेत चांगले यश संपादन केले. मनपाच्या एकूण १७ माध्यमिक शाळा आहेत, त्यापैकी १० शाळांचा शंभर टक्के निकाल लागला. चिकलठाणा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी इशरत इस्माईल सय्यद हिने ९५.४० टक्के गुण मिळवून मनपाच्या शाळांमधून सर्वप्रथम येण्याचा मान पटकवला. सिडको एन-७ शाळेची विद्यार्थिनी प्रतिमा म्हस्केला ९४.४० टक्के गुण मिळाले, ती द्वितीय आली, तर नारेगाव शाळेतील शेख दानेश ९३.२० टक्के मिळवून तृतीय आला.
तालुकानिहाय टक्केवारी औरंगाबाद- ९७.८० सिल्लोड ९७.६६ कन्नड- ९७.२८ खुलताबाद- ९६.९२ गंगापूर- ९६.७९ वैजापूर- ९६.६१ फुलंब्री- ९६.२६ पैठण- ९४.१६ सोयगाव- ९३.७५
गेल्या सहा वर्षांतील जिल्ह्याचा निकाल २०१७ ८९.५६ % २०१८ ९०.८५ % २०१९ ७७.२९ % २०२० ९२.१० % २०२१ ९९.९७ % (अंतर्गत मूल्यमापन) २०२२ ९७.०१ %
७५ टक्क्यांपेक्षा अधिक (प्रावीण्य श्रेणी) : २९,७२९ ६० ते ७४ टक्के (प्रथम श्रेणी) : २१,७८७ ४५ ते ५९ टक्के (द्वितीय श्रेणी) : ८,५२७ ३५ ते ४४ टक्के (उत्तीर्ण) : १,४०१
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.