आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शिवसैनिकांची भाजप पदाधिकाऱ्यास मारहाण, लसीकरण केंद्रावरील कुपन वाटण्यावरून वाद

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद मनपाच्या विजयनगर आराेग्य केंद्रात लसीचे कुपन वाटण्यावरून झालेल्या वादात माजी उपमहापाैर राजेंद्र जंजाळ यांच्यासह काही शिवसैनिकांनी भाजपच्या ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद केंद्रे यांना मारहाण केली. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर ही घटना घडली. यात जखमी केंद्रेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जवाहरनगर पाेलिस ठाण्याला घेराव घातला. शिवसैनिकांनीही विरोधात तक्रार दाखल केली.

प्रत्यक्षदर्शींनुसार, गोविंद केंद्रे व त्यांचे पुतणे धीरज केंद्रे यांनी सकाळी १० वाजता विजयनगर केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सुमारे २० टोकन ताब्यात घेतले व जवळच्या लाेकांना वाटण्यास सुरुवात केली. ही लस माेदींमुळेच मिळत आहे, अशी जाहिरातही त्यांनी केली. त्यामुळे एका व्यक्तीचा केंद्रेंशी वाद झाला. त्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली. जंजाळ व इतर शिवसैनिक तिथे पाेहाेचले. त्यांनी गोविंद केंद्रे यांना पकडून सूतगिरणी चौकातील मंत्री भुमरेंच्या कार्यालयाजवळ नेले आणि तेथे बेदम मारहाण केली. यात बेशुद्ध झालेल्या गोविंद यांचे दहा हजार रुपये, मनगटी घड्याळ, सोन्याची अंगठीही काढून नेल्याची तक्रार देण्यात आली आहे.

शिवसेना कार्यकर्ते आकाश राऊत (गारखेडा) यांनीही केंद्रेविरुद्ध तक्रार दिली. ‘टोकनचा काळाबाजार का करत आहात, अशी विचारणा मी धीरज यांना केल्यावर त्यांनी मला धक्काबुक्की केली. तसेच धमकीही दिली,’ असे तक्रारीत म्हटले आहे.

मी स्वत: टोकन वाटले : डॉ. बैरागी
विजयनगर केंद्रप्रमुख डॉ. कांचन बैरागी म्हणाले की, मी स्वत: टोकन वाटले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आमच्याकडून एकगठ्ठा टोकन घेतले नाहीत. तर मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, लसीकरण मोहिमेत राजकीय मंडळींची मदत होते. पण टोकन यंत्रणेत त्यांचा हस्तक्षेप होऊ नये, याची काळजी घेतली जाते. रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येकाला एक टोकन दिले जाते.

केंद्रेंनी धमकावले, शिवसेनेचीही तक्रार
आकाश राऊत (रा. हुसेन कॉलनी, गारखेडा) यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धीरज केंद्रे यांना मी टोकनचा काळाबाजार का करत आहात, अशी विचारणा केल्यावर त्यांनी मला धक्काबुक्की केली. संध्याकाळपर्यंत कसा राहतो ते पाहतो अशी धमकी दिली. त्यानंतर मी निघून गेलो. अर्ध्या तासाने माझा लहान भाऊ कृष्णा याचा कॉल आला की, आपल्या घरासमोर भाजपचे चिन्ह असलेल्या दुचाकीवर तिघेजण चकरा मारत आहेत.

मीच अॅडमिट केले : जंजाळ
‘माजी नगरसेविकेचे पती गोविंद केंद्रे नेहमी २० टोकन घेऊन भाजप कार्यकर्त्यांना देत असल्याची तक्रार काही दिवसांपासून येत होती. त्यामुळे जाब विचारण्यासाठी मी त्यांना घेऊन सूतगिरणी चौकात आलो. तेथील भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयातही गेलो. तेथे केंद्रे मोबाइलवर माझ्याविषयी अपशब्द वापरत असल्याचे माझ्या कार्यकर्त्यांनी ऐकले. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि केंद्रे चक्कर येऊन खाली पडले. मीच त्यांना रुग्णालयात नेले. ईसीजीपासून सीटी स्कॅनपर्यंतच्या सर्व चाचण्या करून घेतल्या. त्यांच्या अंगाला एक ओरखडादेखील नाही. सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत त्यांना एकही ओरखडा असल्याचे निष्पन्न झाले तर मी शिक्षेला सामोरा जाईन,’ असे जंजाळ म्हणाले.

यापूर्वीही झाला होता वाद : विजयनगर केंद्रावर काही दिवसांपूर्वी लसीकरणाचे बाेर्ड लावण्यावरून केंद्रे आणि मनसेचे संकेत शेटे यांच्यात वाद झाला होता. आमदार अतुल सावेंनी त्यात मध्यस्थी केली होती.

बातम्या आणखी आहेत...