आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीची चाके हलली:लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू; कर्मचाऱ्यांच्या संपामुळे औरंगाबाद विभागाचे 56 दिवसांत 28 कोटींचे नुकसान

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी ५६ दिवसांपासून संपावर आहेत. यामुळे औरंगाबाद विभागाचे २८ कोटींचे नुकसान झाले. दरम्यान, शासन व प्रशासनाच्या आवाहनानंतर २६ डिसेंबरपासून काही कर्मचारी कामावर परतल्याने लांब पल्ल्याच्या बस सुरू झाल्या. विभागाच्या आठ आगारांतील बस फेऱ्या वाढल्याने दररोज सध्या दहा ते बारा लाखांचे उत्पन्न महामंडळाला मिळत आहे.

संपामुळे पुण्यासाठी शिवशाही तसेच जालना वगळता इतर मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस धावत होत्या. २६ डिसेंबरपासून विभागातील २६८४ आंदोलकांपैकी ८०० कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यापैकी दोनशे चालक-वाहक असल्याने एसटीच्या विविध मार्गांवरील फेऱ्या वाढल्या आहेत. सर्व तालुक्यातील आगारातून ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद-नाशिक - ६, उस्मानाबाद - ४, अंबाजोगाई - ४, पुणे शिवशाही २२ अशा लांब पल्ल्याच्या फेऱ्या होत आहेत. २६ डिसेंबरपूर्वी औरंगाबाद विभागाचे उत्पन्न ३ ते ४ लाखांपर्यंत होते. ते आता १० ते १२ लाखांपर्यंत पोहोचले आहे. पूर्वी केवळ पुणे, जालना, सिल्लोड, कन्नड या मार्गावरच बसेस सुरू होत्या. आता गंगापूर, वैजापूरसह इतर तालुक्यांत मागणीनुसार बसेस धावत आहेत. औरंगाबाद विभागातील १५७ कर्मचारी निलंबित, त्यातील २१ जणांना बडतर्फ करण्यात आले. कामावर परतलेल्या १०६ पैकी ३५ कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली.

औरंगाबादच्या दोन्ही आगारांतून धावल्या १०३ बस, २४९१ जणांचा प्रवास

सोमवारी (३ जानेवारी) औरंगाबाद शहरातील दोन्ही आगारांतून १०३ बसच्या २५२ फेऱ्या करण्यात आल्याने, यातून २,४९१ जणांनी प्रवास केला. पुणे मार्गावर सोळा तर नाशिक मार्गावर सात शिवशाही बस चालवण्यात आल्या. आगार क्र. १ सिडको बसस्थानकतर्फे २९ बसच्या ७८ फेऱ्या करण्यात आल्या, त्यात ११२२ प्रवाशांनी प्रवास केला. आगार क्र. २ मध्यवर्ती बसस्थानकातर्फे ६० बस चालवण्यात आल्या, त्यात १३६९ प्रवाशांनी प्रवास केला. तर पैठण आगाराने दहा बसने ३४ फेऱ्या केल्या. वैजापूर आगाराच्या दोन बसने चार फेऱ्या केल्या तर कन्नड आगाराने २१ बस चालवून ३५७ प्रवाशांना सेवा दिली. दिवसभरात जिल्ह्यात २३ शिवशाही, ८१ बसेस अशा एकूण १०४ बसने २५२ फेऱ्या करत ३५७१ प्रवाशांना सेवा दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...