आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी संपावर ठाम:गाडी तर धकली, गती काही मिळेना; प्रवासी त्रस्त मराठवाड्यात मोजक्या मार्गांवरच एसटी बससेवा सुरू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

राज्यातील इतर भागांप्रमाणे मराठवाड्यातही लालपरीची चाके रुतलेलीच असून कर्मचारी संपावर ठाम आहेत. यांत्रिक विभाग व वाहक, चालक असे काही कर्मचारी कामावर येत असले तरी पूर्ण क्षमतेने बससेवा कधी सुरू होईल, असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे. बुधवारी नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमध्ये काही मार्गावर बस धावल्या.

बीड : ४४८ जणांचा प्रवास
जिल्ह्यात बुधवारी बीड, गेवराई, माजलगाव, आष्टी, धारूर, परळी, पाटोदा या सात आगारांमधून १९ बसेस धावल्या. सायंकाळी सहापर्यंतच्या अहवालानुसार ४४८ प्रवाशांनी दिवसभरात प्रवास केला. सुमारे ३०० कर्मचारी कामावर परतले असून दुसरीकडे आंदोलक कर्मचारी संपावर ठाम आहेत.

परभणी : जिल्ह्यात ९ बसच्या १८ फेऱ्या झाल्या
परभणी विभागात बुधवारी फक्त ९ बस धावल्या. ७ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांचा १०० टक्के बंद होता. परभणी विभागातील परभणी व हिंगोली जिल्ह्यात मिळून एकूण ७ आगारे आहेत. बंददरम्यान या सर्व आगारांतून गाड्या धावल्या नाहीत.

पण ६ व ७ डिसेंबर रोजी २२ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ११ गाड्यांच्या एकूण १३ फेऱ्या झाल्या. ८ रोजी कळमनुरी, गंगाखेड आणि परभणी या तीन आगारांतूनच लालपरी धावली. यात ९ गाड्यांच्या १८ फेऱ्या झाल्या. परभणी विभागात चालक, वाहक, यांत्रिकी आणि प्रशासकीय असे एकूण २ हजार ३६३ कर्मचारी आहेत. त्यापैकी बुधवारी केवळ चालक, वाहक, यांत्रिकी आणि प्रशासकीय असे परभणी जिल्ह्यात १९३ तर हिंगोलीत ५८ कर्मचारी उपस्थित झाले. उर्वरित कर्मचारी मात्र आपल्या मागणीवर ठाम आहेत.

उस्मानाबाद : ३८० कर्मचारी कामावर हजर : उस्मानाबाद जिल्ह्यात २ हजार ७६६ एकूण कर्मचारी आहेत. प्रत्यक्ष कामावर ३८० कर्मचारी होते. बुधवारी उस्मानाबाद आगारातून दहा बसेस धावल्या. उमरगा येथून २ बसेस धावल्या. आतापर्यंत १४० जण निलंबित आहेत. उस्मानाबादमध्ये ४७५ एकूण बसेस आहेत.
नांदेडमध्ये हदगाव डेपोची एक बस बुधवारी सुरू झाली. इतर डेपोतून सुरुवात झाली नसून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या ३२३ कर्मचारी रुजू झाले आहेत. यात प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नांदेड : हदगाव एक बस सुरू
जालना : १३४० कर्मचारी संपावर ठाम
जालना जिल्ह्यात एकूण ४ आगारे आहेत. येथे २२० बसेस कार्यरत आहेत. जालना जिल्ह्यात ७ नोव्हेंबर रविवारपासून संपाला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातील एकूण १३४० कर्मचारी संपावर आहेत. परतूर २, जाफराबाद येथे ४ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. म्हणजेच सहा फेऱ्या सुरू झाल्या आहेत. जालना विभागाचे एका दिवसाचे उत्पन्न २५ ते २७ लाख इतके आहे.

बातम्या आणखी आहेत...