आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Tempereture | Whether Update Aurangabad | Marathi News | Aurangabad's Maximum Temperature At 35 Degrees; Sweaty City Dwellers With The Click Of The Sun

दिव्य मराठी विशेष:औरंगाबादचे कमाल तापमान 35 अंशांवर; उन्हाच्या चटक्याने शहरवासीय घामाघूम

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरासरीपेक्षा 3 अंशांनी वाढ, काही ठिकाणी पावसाची शक्यता

गुलाबी थंडीचा ऋतू सरला असून सूर्य तळपायला सुरुवात झाली आहे. बुधवारी शहराचे कमाल तापमान ३५ अंशांवर जाऊन पोहोचले. सरासरीपेक्षा ३ अंशांनी पारा वाढला आहे. दुपारच्या सत्रातील उन्हाच्या चटक्यांनी लोक हैराण व घामाघूम होत आहेत. बदलत्या वातावरणामुळे विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रावर अंशत: ढगाळ वातावरण राहील, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

जानेवारीच्या अखेरच्या टप्प्यात तीव्र थंडीची लाट दाखल झाली होती. २९ जानेवारीला पारा ८ अंश सेल्सियस इतक्या नीचांकी पातळीवर घसरला होता. त्यानंतर हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे तापमानात कमालीचा चढउतार झाले, तर गत सात दिवसांपासून कमाल तापमानात सतत वाढ होत आहे. १६ फेब्रुवारीला कमाल तापमान ३०.७ अंश होते, ते २३ फेब्रुवारी रोजी ३५ अंशांवर जाऊन पोहोचले. किमान तापमान १५ अंशांवर स्थिर आहे. सायंकाळ ते सकाळच्या सत्रात सौम्य थंडी जाणवते. दुपारच्या सत्रात उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. तसेच तापमान वाढीमुळे विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. उर्वरित महाराष्ट्रावर अंशत: ढगांचे आच्छादन राहील. तापमानात अनपेक्षित चढ-उतार होतील. उकाडा जाणवणार आहे.

येथे पावसाची शक्यता : नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, वर्धा, बुलडाणा, अकोला जिल्ह्यात २४ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी, १ मार्च रोजी अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवेचा दाब, वेग, ढगातील बाष्पांची गर्दी, आर्द्रता आदींवर पाऊस निर्भर असतो. वाऱ्याच्या वेगानुसार त्या क्षेत्रात अनपेक्षित बदल होतील.

पाऊस काॽ
औरंगाबादसह महाराष्ट्रातील प्रमुख शहराच्या तापमानात सरासरीपेक्षा १ ते ५ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे पाण्याचे वेगात बाष्पीभवन होईल. समुद्रावरून बाष्प, उत्तरेतून थंडी खेचून आणण्यासाठी हे वातावरण पोषक ठरेल. आकाशात थंड, उष्ण, बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होऊन ढगांची चादर पसरेल व जेथे कमी हवेचा दाब, आर्द्रतेत वाढ आदी पोषक वातावरण तयार होईल तेथेच पाऊस पडेल. उर्वरित ठिकाणी अंशत: ढग घोंगावतील.

ही घ्या काळजी
दुपारी काम असेल तरच बाहेर पडावे. डोक्याला व कानाला पांढरा रुमाल बांधावा, डोळ्याला गॉगल लावावा, हलके कपडे घालावेत, पाणी जास्त प्यावे व प्रवासात सोबत ठेवून काही अंतराने पाणी पीत राहावे. पशुधन, वन्य प्राणी व पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

बातम्या आणखी आहेत...