आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मातृत्वप्राप्ती हा महिलांसाठी सर्वात मोठा सन्मान असला तरी सामाजिक भीतीमुळे काही महिला, दांपत्ये हा सन्मान (मूल) कचराकुंडी, रस्त्यावर किंवा अनाथाश्रमात टाकून देतात. ही एक नकारात्मक बाजू असली तरी टाकून दिलेले बाळ परत नेले जात आहे, असे आशादायी चित्रही आता निर्माण झाले आहे. औरंगाबाद शहरातील अशी शिशुगृहे किंवा अनाथाश्रमातून टाकून दिलेले मूल परत नेल्याची काही उदाहरणे समोर आली असून या मुलांना आईची कूस मिळाली तर पालकांना मातृत्व आणि पितृत्वाचा गमावलेला आनंद परत मिळाला आहे.
औरंगाबादमध्ये भारतीय समाज सेवा केंद्र आणि ‘साकार’ही दोन शिशुगृहे (अनाथाश्रम)आहेत. या संस्थांत ० ते ६ वयोगटातील २० हून अधिक मुले आहेत. ज्या बालकांना कुणी घेण्यास येत नाही ती नंतर दत्तक दिली जातात. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (कारा) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर बाळ दत्तक देण्याची प्रक्रिया सुरू होते. या पूर्वी एकदा बाळ दिल्यानंतर पालक परत येत नव्हते. मात्र आता मुले परत नेली जात आहेत. यात एकल पालकांचाही समावेश आहे. कुमारी माता, लैंगिक अत्याचार, प्रेम प्रकरणातील फसवणुकीतून जन्मलेले बाळ रस्त्यावर, कचरा कुंडीत तर कुणी संस्थेच्या पाळण्यात टाकून पळ काढतात.
हा एक सकारात्मक बदल
काही कारणाने त्यावेळी बाळ सांभाळणे शक्य नव्हते. मात्र आता आम्ही बाळाशिवाय राहू शकत नाही, अशी जाणीव झालेले पालक आमच्याकडे येतात. बालकल्याण समितीच्या मदतीने त्यांची मुले परत केली जातात. आम्ही या बालक आणि पालकांची नावे गाेपनीय ठेवताे. आम्ही आमच्या बाळाची जबाबदारी घेऊ शकतो, असा विचार केला जाताेय, हाच मोठा बदल आहे. - वसुधा जातेगावकर, शाखा संचालिका, भारतीय समाज सेवा केंद्र
चित्र आशादायी
वीस वर्षांत मला असे चित्र पाहायला मिळाले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून पालक आपल्या पोटच्या गोळ्याला परत नेत असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. देशातील शिशुगृहांत असेच चित्र दिसले तर अनाथाश्रमांची गरजच राहणार नाही. बाळांना आई-वडिलांचे प्रेम मिळेल, जो त्यांचा नैसर्गिक हक्क आहे. - अॅड. अर्चना गाेंधळेकर, ‘साकार’च्या कायदेशीर सल्लागार
बाळाला दूध पाजण्यासाठी ती स्वत:हून आली
काही दिवसांपूर्वी संस्थेत एक महिला आली. ती तीन वेळेस प्रसूत झाली. मात्र मुले वाचली नाहीत. तिला ममत्वाचा पाझर फुटला होता. कुण्या तरी बाळाला दूध पाजावे, म्हणून ती संस्थेत आली. आम्हीही तिच्याकडे बाळ दिले. बाळांना आईच्या दुधाची गरज असते. ते आमच्याकडे उपलब्ध नसते. विदेशात मिल्क बँक आहेत. मात्र आपल्याकडे अशी सुविधा नाही. मात्र ती माता स्वत:हून समोर आली. हे काळ बदलल्याचे द्योतक आहे, असे अॅड. गाेंधळेकर म्हणाल्या.
उदाहरण १ : तीन अपत्यांमुळे सरकारी नोकरी जाते, असे जेव्हा प्रकाश-नम्रता (बदललेले नाव) दांपत्याला कळल्याने त्यांनी पाेटचे मूल अनाथाश्रमात सोडून दिले. मात्र काही दिवसांनी त्यांना तिसऱ्या अपत्यामुळे नोकरी जात नाही तर काही सुविधा मिळत नाहीत, असे समजल्यावर त्यांनी आपले १० दिवसांचे बाळ परत नेण्यासाठी संस्थेत धाव घेतली. संस्थेने खात्री पटवून कायदेशीर कार्यवाहीनंतर बाळ परत िदले.
उदाहरण २ : एका जोडप्याला लग्नाआधी बाळ झाले. सामाजिक भीतीने त्यांनी त्यास अनाथाश्रमात सोडले. मात्र आम्ही लग्नानंतर बाळ परत नेऊ, असे संस्थेला सांगितले. पाच महिन्यानंतर नीलेश-स्वाती (बदललेले नाव) यांनी लग्न करून आपले बाळ परत नेले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.