आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:निर्दयी कोरोनाने चिमुकलीलाही आईच्या कुशीतून नेले; ‘आलू का चालू बेटा’ गाणे लागले की शांत व्हायची

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्याच दिवशी चाचणी केली असती तर सहा महिन्यांची श्रुती वाचली असती

गेल्या वर्षभरात काेराेनाने जिल्ह्यातील पावणेदाेन हजार लाेकांचे बळी घेतले. अनेक कुटुंबीयांनी कर्ते पुरुष गमावले तर काही जण अाईच्या मायेला पारखे झाले. मात्र, अातापर्यंतच्या मृतांपैकी सर्वात लहान असलेल्या सहा महिन्यांच्या श्रुतीचा मृत्यू केवळ तिच्या कुटुंबीयांनाच नव्हे तर सर्वांनाच चटका लावून गेला. १५ दिवस या चिमुकलीने काेराेनाशी झुंज दिली, मात्र डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही ती या महामारीच्या कराल जबड्यातून बाहेर येऊ शकली नाही. पाेटच्या मुलीच्या जाण्याच्या धक्क्यातून अाई-वडील अजूनही सावरलेले नाहीत. श्रृतीच्या अाठवणी साश्रू नयनांनी सांगताना तिचे वडील सतीश जाधव म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी अामचे लग्न झाले. सप्टेंबर २०२० मध्ये श्रुतीचा जन्म झाला. अाम्ही तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होतो. काेराेनाच्या काळात खूप काळजी घेत हाेताे. मी बाहेरून अाल्यानंतर अंघोळ करूनच घरात जायचो.

श्रुतीला जवळ घेण्यापूर्वी सॅनिटायझेशन करायचाे. त्यामुळे तिला संसर्गाची लागण झाली असेल यावर विश्वास बसत नाही. १२ मार्चला तिला पहिल्यांदा ताप आला. आम्ही जवळच्या खासगी रुग्णालयात दाखवले. डॉक्टरांनी ६ दिवसांची औषधी दिली. नंतर ताप कमी झाला होता. पुन्हा १९ मार्चला ताप आला. तेव्हा दुसऱ्या रुग्णालयात दाखवले. तिथेही चार दिवस औषधोपचार झाले. २१ मार्चला पुन्हा ताप आला. घरची मंडळी औषधी देण्यात चुकत असावी म्हणून मी स्वतःच औषधी देऊ लागलो. तरीही आराम पडत नव्हता. मग मोठ्या खासगी रुग्णालयात नेले. तेथील डाॅक्टरांनी न्यूमोनिया असल्याचे सांगून अॅडमिट करा, दर दिवशी १० हजारांचा खर्च येईल असे सांगितले. हा खर्च झेपणारा नव्हता. म्हणून २७ मार्चला घाटीत दाखल केले. एक दिवस बालरोग विभागात उपचारही मिळाले, २८ मार्चला तिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर कोविड वॉर्डात दाखल केले अन् त्याच दिवशी ती दगावली.’

‘आलू का चालू बेटा’ गाणे लागले की शांत व्हायची
श्रृती जेव्हा रडायची तेव्हा अाम्ही कार्टूनमधील ‘आलू का चालू बेटा..’ हे गीत तिला एेकवायचाे. कितीही रडत असली तरी हे गाणे एेकून ती हसू लागायची. रुग्णालयातही जेव्हा तापाने फणफणल्यानंतर उपचार घेत असताना हे गाणे लागले की शांत व्हायची, असे सतीश म्हणाले.

आजारांकडे दुर्लक्ष नको
दुसऱ्या लाटेत कोरोना बदलला आहे. आपल्या अनेक जवळच्यांना तो घेऊन जात अाहे. पण आता अापण अधिक जागरूक राहिले पाहिजे. मास्क वापरा, शारीरिक अंतर पाळा अाणि कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. विशेष म्हणजे लहान मुलांचा असाे की माेठ्यांचा काेणताही अाजार अंगावर काढू नका, वेळीच तपासणी करून घ्या, असे आवाहन सतीश जाधव यांनी औरंगाबादकरांना केले.

आई सावरली नाही
लहान मुलांना कोरोना होतच नाही, असे एेकले हाेते. त्यामुळे जेव्हा श्रृतीला ताप अाला तेव्हा काेराेनाची शंकाही मनात अाली नाही. मात्र त्याच वेळी तिची चाचणी केली असती तर कदाचित श्रुती अाज आमच्या कुशीत असती. सहाच महिन्यात तिचा सगळ्यांनाच लळा लागला होता. तिची आई आरती अजूनही मुलगी जाण्याच्या धक्क्यातून बाहेर पडलेली नाही, हे सांगताना सतीश यांचा कंठ दाटून आला होता.

बातम्या आणखी आहेत...